Chardham Yatra: चारधाम यात्रेच्या नावाखाली भाविकांना गंडा
Chardham Yatra: हेलिकॉप्टर, हॉटेल बुकिंगच्या आमिषाला भुलू नका; फेक वेबसाइट्स आणि सोशल मीडिया जाहिरातींतून फसवणूक

पिंपरी – चारधाम यात्रेतील बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा, हॉटेल बुकिंग आणि स्वस्त टूर पॅकेजचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. अधिकृत संकेतस्थळासारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार करून भाविकांकडून पैसे उकळले जात असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चारधाम यात्रेसाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उत्तराखंडमध्ये दाखल होतात. पिंपरी-चिंचवडमधूनही अनेक नागरिक यात्रेचे नियोजन करतात. हीच गर्दी आणि भाविकांची घाई लक्षात घेऊन सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा मार्ग अवलंबला आहे. गुगलवर चारधाम हेलिकॉप्टर सेवा, हॉटेल बुकिंग किंवा टूर पॅकेज शोधल्यानंतर काही बनावट वेबसाइट्स समोर येतात.
या वेबसाइट्स अधिकृत असल्याचा भास निर्माण केला जातो. आकर्षक दर आणि मर्यादित वेळेच्या ऑफर दाखवून भाविकांना तातडीने बुकिंग करण्यास प्रवृत्त केले जाते. पैसे ऑनलाइन भरल्यानंतर मात्र बुकिंग होत नाही. संबंधित व्यक्तीशी संपर्कही होत नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. काही जाहिरातींमध्ये हेलिकॉप्टर तिकीट, व्हीआयपी दर्शन आणि हॉटेलची सुविधा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले जाते. भाविकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेलिकॉप्टर बुकिंग करताना केवळ अधिकृत आयआरसीटीसी संकेतस्थळाचा वापर करावा.
अनोळखी लिंक, सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हॉट्सॲपवरून आलेल्या लिंकवर क्लिक करून बुकिंग करू नये. अतिशय स्वस्त दरात सेवा देण्याचे आमिष दाखवले जात असल्यास अधिक सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर किंवा वैयक्तिक बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत.
चारधाम यात्रा नोंदणी आणि अधिकृत माहितीसाठी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या +91-8394833833 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर “Yatra” असा संदेश पाठवून माहिती घेता येते.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्डचे तपशील, सीव्हीव्ही किंवा यूपीआय पिन कोणालाही देऊ नये. फसवणूक झाल्यास वेळ न दवडता १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
‘चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये. कोणत्याही अनोळखी लिंक किंवा सोशल मीडियावरील मोहात पाडणाऱ्या जाहिरातींवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नका. केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय क्रमांकांचाच वापर करा. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.’ – रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे)





