Devendra Mahato : उपोषण मागे घेतले, आंदोलन नाही; देवेंद्र महतो यांचा सरकारला इशारा
झारखंड सरकारने कथित अनियमिततांमुळे काही नोकरभरती परीक्षा रद्द केल्यानंतर जेएलकेएमचे नेते देवेंद्र महतो (Devendra Mahato) यांनी मंगळवारी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली.

Devendra Mahato : झारखंड सरकारने कथित अनियमिततांमुळे काही नोकरभरती परीक्षा रद्द केल्यानंतर जेएलकेएमचे नेते देवेंद्र महतो (Devendra Mahato) यांनी मंगळवारी आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली. जेपीएससी आणि जेएसएससीच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटणे तसेच अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने ठोस हमी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
महतो (Devendra Mahato) यांनी सलग १६ दिवस उपोषण केल्यानंतर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण मागे घेतले आहे, आंदोलन नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सरकारकडून भरती परीक्षांमध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही, याची हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना महतो यांनी सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखालील जेपीएससी-जेएसएससी अभ्यार्थी सुधार मंच’च्या बॅनरखाली आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल. भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर लेखापरीक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली. केवळ आर्थिक ऑडिट न करता संपूर्ण प्रक्रियेचे ऑडिट झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रश्नपत्रिका फुटणे आणि भरती परीक्षांतील अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक असल्यास सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणीही महतो यांनी केली. तसेच परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी वरिष्ठ आयएएस अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणा समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. ही समिती भरती परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करणार आहे. सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेली जेएसएससी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच २०१४ पासून बाह्य संस्था टीडीपीएल मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा आणि त्यांचे जाहीर निकाल रद्द करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या निर्णयानंतरही भरती प्रक्रियेतील सुधारणांसाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा महतो (Devendra Mahato) यांनी दिला आहे.






