Devendra fadnavis”त्यांचं पाप आमच्या माथी नको”; फडणवीसांकडून कंत्राटी भरतीच्या आरोपांवर सडेतोड उत्तर

Devendra fadnavis : राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून मविआच्या नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत पोलीस विभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. जीआर रद्द करतेवेळी फडणवीसांनी मविआ नेत्यांवर सडकून टीका केली.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदे घेत कंत्राटी भरतीचा लेखाजोखा मांडला. यात त्यांनी याची सुरुवात करणाऱ्या काँग्रेसला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सरकारची शिवसेना याना धारेवर धरले. यावेळी बोलताना,”महाराष्ट्रात कंत्राटी भरती संदर्भात मोठा गदारोळ केला जातोय. जे याचे दोषी आहेत ज्यांनी हे केलयं तेच जास्ती आवाज करत आहेत. कंत्राटी भरतीचे दोषी कोण आहेत हे समोर आले पाहिजे. त्यामुळं यांचं थोबाड बंद होण्यासाठी काही गोष्ट मी तुमच्यापर्यंत मांडतो आहे. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय १३ मार्च २००३ साली झाला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना ही भरती शिक्षण विभागात झाली. असे त्यांनी म्हटले.
त्यासोबतच “त्यावेळी अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ही भरती झाली. यामध्ये वाहनचालक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपीक यापदांसाठी भरती झाली. त्यानंतर पुन्हा तेच मुख्यमंत्री असताना पुन्हा कंत्राटी भरती झाली. यात सहा हजार पदं भरण्यात आली. शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा १४ जानेवारी २०११ रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरती झाली, असल्याची माहिती दिली.
पुढे याचा क्रम पुन्हा १ सप्टेंबर २०२१ रोजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंत्राटी भरतीला मान्यता दिली गेली. १५ जून २०२० रोजी याबाबतचा शासन निर्णय निघाला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शासनाचे सल्लागार शरद पवार यांच्या आशीर्वादानं १५ वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यात आले. नंतर आम्हाला कळलं की या कंत्राटदारांचे रेट जास्त आहेत. हे सर्व पाप शंभर टक्के काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचं आहे. एवढं सर्व असतानाही हे आंदोलन करत आहेत. मला असं वाटतं की यांना लाजा कशा वाटत नाहीत, असा परखड सवाल त्यांनी केला.
त्यासोबतच यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारनं का उचलायचं? अशी आमची बैठकीत चर्चा झाली. त्यामुळं आम्ही त्यांनी काढलेल्या कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द केला आहे. पण आता माझा सवाल आहे की, मविआचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला. यासोबतच त्यांनी आमचे सरकार कंत्राटी भरतीचा काढण्यात आलेला जीआर रद्द करत असल्याची मोठी घोषणा केली.





