Devendra fadnavis : मशिदीचा अवैध भाग पाडल्यामुळे धारावीत तणाव; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिकिया आली समोर, पाहा Video

Devendra fadnavis | Dharavi : मुंबईतील धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यात आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हा बेकायदाशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम आली होती मात्र जमावाने गोंधळ घातला. लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनासह अन्य काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.
परिस्थिती पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धारावीतील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, यावर आता स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “अनधिकृत बांधकामांसदर्भात न्यायालयाचे निर्णय आहेत. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते.
तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. तेव्हा ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल, अशी विनंती करण्यात आली होती. आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले की, पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो.
त्यामुळे टीम परत आली आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. मशीद कमिटीने महापालिकेला ज्या प्रमाणे लिहून दिलंय, त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील याचा विश्वास आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील धारावी येथील 90 फूट रोडवरील 25 वर्षे जुनी सुभानिया मशीद बीएमसीने अनधिकृत ठरवली होती आणि ती आज पाडली जाणार आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या कारवाईपूर्वीच काल रात्रीपासून मुस्लिम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता अडवला. ही मशीद खूप जुनी असल्याचे मुस्लिम समाजाचे लोक सांगतात.





