Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी केला महिला जागर; लेकीचा उल्लेख करत म्हणाले… ‘मी मुलीचा बाप’

मुंबई : आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ दशकपुर्ती समारोप व कन्यारत्न सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुलीचा उल्लेख करून मुलीच कशा चांगल्या असतात याचं उदाहरण दिले आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.
मुलांपेक्षा मुली बऱ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी स्वतः मुलीचा बाप असल्याने सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या आई बापाची काळजी जास्त घेतात. त्यामुळे आता ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजात बदलत आहे, असं फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. 2029 पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होणार आहे. 2047 मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरणार आहे.
सामाजिक बंधनातून खडतर प्रवास करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि महिलांसाठी केशवपन प्रथा बंद केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उत्तम प्रशासक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या अशा शक्तिरुपी स्त्रियांचा विचार आणि आदर्श घेऊन काम केल्यास प्रगती साध्य करता येईल.
लोकसंख्येत ५० टक्के महिला असून, महिलांना केंद्रस्थानी ठेवून मानव संसाधन विकसित केल्यास देश विकसित होईल हे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘लेक लाडकी’ ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लखपती दीदी पर्यंत योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले आहेत आणि लिंगभेदाचे, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी सुरू केलेल्या क्रेडिट सोसायटीचा विस्तार वाढवून उद्योगात आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.





