Devendra Fadnavis : एका प्रकाशकाविरोधात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वापरलेली भाषा स्वीकारार्ह नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा सार्वत्रिक आणि सर्वांना मान्य असलेला विषय आहे, यावरही त्यांनी भर दिला. एका मराठी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केवळ त्यांच्या शिवाजी या नावाने केल्याबद्दल आक्षेप घेत, गायकवाड यांनी कोल्हापूर येथील प्रकाशक प्रशांत अंबी यांना दूरध्वनीवरून धमकावले होते. या प्रकारामुळे मोठा वाद निर्माण झाला. हे पुस्तक मूळतः दिवंगत सीपीआय नेते गोविंद पानसरे यांनी लिहिले होते. ४० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकावरून आता मुद्दा उपस्थित करणे योग्य नाही. तसेच, अशा प्रकारची आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरणेही स्वीकारार्ह नाही, असे फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या संपूर्ण प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार गायकवाड यांना योग्य त्या सूचना देतील, असेही त्यांनी नमूद केले. Devendra Fadnavis आमदारांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, महाराजांच्या नावाने असलेल्या सर्व संस्थांच्या नावापुढे छत्रपती हा शब्द जोडून, त्यांचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज असे केले जावे, हा मुद्दा आपण यापूर्वीच विधानसभेत उपस्थित केला होता. प्रकाशकाविरोधात मी जे काही आक्षेपार्ह उद्गार काढले असतील, त्याबद्दल मी आता खेद व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकात काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख अनादराने केल्याची उदाहरणे आढळतात, असा दावाही त्यांनी केला आहे.