‘देवेंद्र फडणवीस सरकारी रुग्णालयात बरे होतात,अन् सरकारच्या अठरा मंत्र्यांवर..’ – राम सातपुते

मुंबई – करोना काळात सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागली. असे असताना दुसरीकडे दोन वर्षात राज्य सरकारमधील 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. हा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. यामुळे मंत्र्यांचाच सरकारी यंत्रणा आणि रुग्णांलयांवर विश्वास नव्हता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरूनच भाजप नेते राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर खोचक टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis हे सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन बरे होतात आणि सरकारच्या अठरा मंत्र्यांवर खासगी पंचतारांकित रुग्णालयात उपचार केले .
आणि या सगळ्या मंत्र्यांच्या हॉस्पिटलचे बिल सरकारने भरले ..
वसुली आणि लुटारू सरकार @TopeRajesh @OfficeofUT @narendramodi pic.twitter.com/syH2XRXe8b— Ram Satpute (@RamVSatpute) April 21, 2022
राम सातपुते यांनी ट्विट केले आहे की ,’विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन बरे होतात आणि सरकारच्या अठरा मंत्र्यांवर खासगी पंचतारांकित रुग्णालयात उपचार केले. आणि या सगळ्या मंत्र्यांच्या हॉस्पिटलचे बिल सरकारने भरले वसुली आणि लुटारू सरकार अशी खोचक टीका सातपुते यांनी ट्वीट करत केली आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राज्य सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी करोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. गेली दोन वर्ष करोना काळात सर्वसामान्य उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल 1 कोटी 39 लाख खर्च केले. पण हे उपचार सर्वसामान्यांच्या खर्चावर झाल्याने आता वाद निर्माण झाला आहे.
या 18 पैकी सर्वाधिक नऊ मंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यानंतर कॉंग्रेसचे सहा आणि शिवसेनेचे तीन मंत्री आहेत. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही समावेश आहे.
राजेश टोपेंच्या उपचारासांठी तब्बल 34 लाखांचा खर्च आला असून हे पैसेही सरकारी तिजोरीतून भरण्यात आले आहेत. या यादीत अशोक चव्हाण, संजय बनसोडे, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. त्यांनी दोन लाखांपर्यंत उपचार घेतले आहेत. तसेच आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी एक लाखापर्यंतचा खर्च केला आहे. तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 50 हजारांच्या आसपास उपचार घेतले आहेत. दरम्यान, छगन भुजबळ म्हणाले की, मागील वर्षी मी दाखल झालो असेन तर ते करोनासाठी नव्हते. पण करोना किंवा इतर कोणत्याही आजारासाठी सर्व आमदारांना सरकारने तशी सोय उपलब्ध करून दिली असेल तर त्याचा फायदा सर्व लोक घेतात. तसेच यात भाजप आणि इतर पक्षाचेही नेते सापडतील, असा खुलासा त्यांनी केला.





