मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानाचे स्थान ; फोटोसेशनसाठी पहिल्या पक्तींत

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपाचे सर्वोच्च नेते आहेत. राज्यात त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जातो. दरम्यान, भाजपाने देशातील भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च स्थान देण्यात आलंय. बैठक मुख्यमंत्र्यांची होती. पण उपमुख्यमंत्री असूनही ते फोटोसेशनसाठी पहिल्या पक्तींत बसल्याचे दिसत होते. या फोटोवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपस्थिती Devendra Fadnavis |
उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पहिल्या रांगेत बसल्याचे दिसले. सध्या चर्चेत असलेल्या या फोटोत भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. पहिल्या पंक्तित नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दिसत आहेत. या पहिल्या पंक्तित देशातील महत्त्वाच्या राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. याच रांगेत उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आलंय.
फडणवीसांना पहिल्या रांगेत मानाचं पान Devendra Fadnavis |
पहिल्या रांगेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आहेत. शर्मा यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस आसनस्थ झालेले पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे 27 आणि 28 जुलै अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मुख्यमंत्री परिषदेला फक्त मुख्यमंत्री असतील अशी अपेक्षा होती. पण या बैठकीला देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. एवढंच नव्हे तर पार्टीचा प्रोटोकॅाल तोडून फडणवीस यांचं पहिल्या रांगेतलं स्थान कायम ठेवण्यात आलं. म्हणूनच या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
पुन्हा एकदा सरकारमध्ये कायम राहण्याचा आदेश
दरम्यान,लोकसभा निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली नाही. याची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारबाहेर थांबवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला पूर्ण ताकदीने प्रयत्न करायचे आहेत. मला जबाबदारीतून मुक्त करावे. तशी विनंती मी दिल्लीतील नेत्यांकडे करणार आहे, असे त्यावेळी फडणवीस म्हणाले होते. पण तेव्हादेखील भाजपाच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांनी फडणवीसांचे महत्त्व ओळखत त्यांना सरकारमध्ये कायम राहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीसांना पहिल्या पंक्तीत मानाचे स्थान देण्यात आले आहे.





