सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत वर्षा बंगल्यावर बैठक झाली असून लवकरच त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याचे समजते. आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उबाठा नेते दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात भेट देत भाषणही केले आहे. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या भाजपचे कमळ जोरदार खुलत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भाजपा प्रवेश होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे ऑपरेशन लोटस सुरू असून सोलापूर जिल्ह्यात दिवाळीचे अजून फटाके फुटणार, अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या भेटीनंतर दिली आहे. सांगोला येथे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात पालकमंत्री गोरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना गोरे यांनी हे राजकीय संकेत दिले आहेत. दोनच दिवसापूर्वी जिल्ह्यातले चार माजी आमदार पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाच्या तयारीत असताना आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि सध्या शिवसेना उबाठा पक्षात असणारे माजी आमदार दीपक साळुंखे हे देखील भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. ऑपरेशन लोटस सोलापूर जिल्ह्यातील अजून किती पक्ष मोकळे करणार हे दिवाळीनंतर कळणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे बबन शिंदे, मोहोळचे यशवंत माने आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हे पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.