Devendra Fadnavis | पैशाची चिंता करू नका, प्रकल्पाची गुणवत्ता राखा – मुख्यमंत्री फडणवीस..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पूर्वनियोजन, कालमर्यादा, पारदर्शकता, गुणवत्ता आणि विविध विभागांच्या समन्वयाच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची गतीने उभारणी करून सर्व यंत्रणांनी एकत्रितरीत्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पैशाची चिंता तुम्ही करू नका. तो उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. लीडरशिप आणि ओनरशिप घ्या. कामाची गुणवत्ता राखण्यासाठी प्रकल्प सुरू असताना लक्ष ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.यशदा येथे आयोजित पायाभूत सुविधा विकास प्रकल्प प्रशिक्षणाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, मुख्य सचिव राजेशकुमार, प्रधान सचिव अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, की प्रकल्पांसाठी विकसक निवडताना त्याच्या क्षमतांचा विचार करणे गरजेचे आहे. प्रकल्प पूर्ण होत असताना काम गुणवत्तापूर्ण, दर्जेदार होत असल्याची खात्री करावी. प्रकल्पाची किंमत वाढू नये, यासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण करावे.मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन पायाभूत सुविधा क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केल्यानंतरच पूर्ण होईल. त्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.
दर दोन महिन्यांनी आढावा..
पायाभूत सुविधा प्रकल्प हे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी वॉर रूमची स्थापना केली असून, दर दोन महिन्यांनी कामांचा आढावा घेण्यात येतो. पायाभूत सुविधा प्रकल्प अंमलबजावणीची क्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा निश्चितच उपयुक्त आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.





