Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, थेट म्हणाले….

Devendra Fadnavis | Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरशी घेत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीतील धुसफूस सातत्याने समोर येत होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
एकीकडे राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडुन मोठी घोषणा करण्यात आली आहे. “महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपले पक्ष मजबूत करावे”. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान संजय राऊतांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. ते म्हणाले की, “संजय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलंय. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मत व्यक्त करायला मी कोणाला बांधील नाही. ते रिकामटेकडे आहे, ते रोज बोलतात. मी रिकामटेकडा नाही. असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला. यावेळी ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
नागपूरच्या मेयो रुग्णालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांकडून नकाशा प्रमाणे सुरू असलेले काम समजून घेतले. जो कंत्राटदार विविध विकासकामांची उभारणी करत आहे त्याच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच, काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, गती वाढवण्याची आवश्यकता आहे, एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
‘मुंबईपासून नागपूर महापालिका स्वबळावर लढणार’
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत.
आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे, नागपूर. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपले पक्ष मजबूत करावे”, असे संजय राऊत म्हणाले होते.





