प्रभात वृत्तसेवा फलटण – मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फलटण शहर आणि तालुक्यातील शेकडो कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, उदघाटन आणि भूमिपूजन समारंभाचे आयोजन उद्या रविवारी दि. २६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.फलटण नगरपालिका आणि जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. खंडाळा, धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पांतर्गत बंद पाइपलाइनद्वारे योजनेचे उद्घाटन व लोकार्पण आणि त्यापुढील टप्प्याचे भूमिपूजन, नाईकबोमवाडी एमआयडीसीतून हजारोंच्या भविष्याचे दालन खुले करणार असून यावेळी या वसाहतीची विविध कंपन्यांच्या प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीमध्ये पाहणी करुन आढावा बैठक होणार आहे. याशिवाय दहिवडी – फलटण रस्त्याचे भूमिपूजन, फलटण नगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची उद्घाटने, फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या इमारतींचे उद्घाटन, १०० कोटींची महसूल अंतर्गत प्रशासकीय इमारत व अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन, बारामतीप्रमाणे फलटणमधून वाहणाऱ्या नीरा उजव्या कालव्याचे सुशोभिकरण प्रकल्प, फलटणमधील ८५ कोटीच्या काँक्रिट रिंग रोडचे उदघाटन, सेशन कोर्ट, महसूल भवन इत्यादी अनेक कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. फलटणचा भविष्यकाळ व विकास कसा असेल, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमातून समजणार असून आगामी नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधी गटाचा सुफडासाफ होणार असल्याचा टोला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला. कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. मंजूर झालेली व पूर्णत्वास आलेली विकास कामे फडणवीस यांच्या दौर्यात केंद्रस्थानी असणार आहेत. या प्रकल्पांमुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून या कार्यक्रमांच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करुन आगामी नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच फोडण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान भाजपमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा राजकीय घडामोडींनाही गती देणारा ठरण्याची चिन्हे आहेत. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस फलटण तालुक्यासाठी विशेष घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. तालुक्याच्या विकासासाठी नव्या प्रकल्पांची किंवा निधीच्या घोषणांची शक्यता असून त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.