Baramati Byelection 2026 : “जनभावनेचा आदर करा, उमेदवार मागे घ्या!”, देवेंद्र फडणवीसांचे काँग्रेसला आवाहन
Baramati Byelection 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसला आपला उमेदवार आकाश मोरे यांचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Baramati Byelection 2026 : जनभावनेचा आदर करा आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील आपला उमेदवार मागे घेऊन बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होईल याची खात्री करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या जागेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ४ मे रोजी मतमोजणी होईल. (Baramati Byelection 2026)
मेट्रो लाइन ९ कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर मीरा-भाईंदर येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, या दुर्दैवी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील जनतेची अशी इच्छा आहे की, या निवडणुकीत सर्वसंमत उमेदवार असावा. जनभावना सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आहे.
मला अशी अपेक्षा आहे की, काँग्रेस पक्ष या जनभावनेचा मान राखेल. जनतेची अशी इच्छा आहे की, सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून याव्यात. जर काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली, तर त्याचा अर्थ अजित पवार यांच्या स्मृतीचा आदर करणे असा होईल.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल आहे. (Baramati Byelection 2026)





