नागपूर : मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील. आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर, मंत्रीपदे कोणाला द्यायची हे सर्वजण ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की, सर्वानी आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी, असे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत. शिंदेसाहेब, मी आणि अजितदादा आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. निवडणुकीच्या पूर्वी ही आम्ही सांगितलं होतं की सर्व निर्णय सोबत बसून होतील. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील. त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार आहे. त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतु परंतु असेल तर ते ही आज एकनाथ शिंदे यांनी दूर केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.