Shiv Sena (UBT) : “पैशांचा माज एक दिवस फडणवीस यांनाही अडचणीत आणेल”; ‘उबाठा’चा घणाघात, सगळचं काढलं
Shiv Sena (UBT) : मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सहा खासदारांनी हाती धनुष्यबाण घेत उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे जय महाराष्ट्र केला.

Shiv Sena (UBT) : अॅापरेशन टायगर यशस्वी करण्यात एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या अॅापरेशनची केवळ चर्चा झाली. मात्री अंतर्गत नेमकं काय सुरू आहे. याविषयी माहिती समोर आली नव्हती. दरम्यानच्या काळात काही अशा घडामोडी देखील घडल्या, ज्यामुळे फुटीर खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येतील असं वाटलं; पण तसं झाले नाही.
काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सहा फुटीर खासदारांनी हाती धनुष्यबाण घेत उद्धव ठाकरे यांना अधिकृतपणे ‘जय महाराष्ट्र’ केला. यावर आता ‘सामना’ या दैनिकातून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. तसेच सरकारला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला आहे.
कारण दिल्लीच्या एका गटाची….
मिंधे, फडणवीसांच्या भ्रष्ट हातमिळवणीमुळे महाराष्ट्र 25 वर्षे मागे ढकलला गेला आहे. राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. मिंध्यांचे राजकारण, पैशांचा माज एक दिवस फडणवीस यांनाही अडचणीत आणेल. कारण दिल्लीच्या एका गटाची फडणवीस यांच्या विरोधात मिंध्यांना उघड फूस आहे हे उघड झाले आहे. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री फडणवीस मिंध्यांच्या बाळंतपणावर बोलतात व पेढे वाटतात. मिंधे बाळंत झाले. त्यांना सहा गद्दार झाले. आता त्या गद्दारांचे खरे आई-बाप कोण? एवढे मात्र मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, अशी झोंबणारी टीका करण्यात आली आहे.
📍 #मुंबई |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा विद्यमान खासदारांनी आज हाती भगवा झेंडा घेत #शिवसेना पक्षात प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेने आता आता चौकार नव्हे तर षटकार मारला असल्याचे मत व्यक्त केले.
या… pic.twitter.com/418DtvTLUF
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2026
‘गद्दारी’ यशस्वी झाल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राला असंख्य प्रश्न भेडसावत आहेत. त्या प्रश्नांची चिंता सरकारच्या थोबाडावर किंचितही दिसत नाही. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार एकत्र आले. एरवी तर फडणवीस आणि शिंदे-मिंध्यांत विस्तव जात नाहीच, पण प्रसिद्ध झालेले कालचे त्यांचे छायाचित्रही त्यादृष्टीने बोलके आहे. फडणवीस बोलत असताना शिंदे हे दुसऱ्या दिशेला पाहत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलायला हवे होते, पण ते बोलले शिवसेनेतील गद्दारीवर. ‘गद्दारी’ यशस्वी झाल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. अशा शब्दांत फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे.
हेही वाचा : Omraje Nimbalkar post : “पक्ष बदलला असला तरी….”; हाती धनुष्यबाण घेतल्यानंतर ओमराजेंची पहिली पोस्ट
किमान 500 कोटी रुपये खर्च झाले
अग्रलेखात पुढे लिहिण्यात आले आहे की, मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गद्दारीचे ऑपरेशन यशस्वी झाले असून रुग्ण सुस्थितीत आहे.’’ थोडक्यात त्यांना म्हणायचे आहे की, मिंधे बाळंत झाले व त्यांनी एकाच वेळी सहा सुदृढ गद्दारांना जन्म दिला. हे बाळंतपण साधे नव्हते. ते यशस्वी होण्यासाठी किमान 500 कोटी रुपये खर्च झाले. आता या बाळाचे खरे बाप कोण? यावर संशोधन सुरू आहे. मिंध्यांनी सहा गद्दारांना जन्म दिल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीत अमित शहादेखील पेढे वाटत आहेत. असं म्हटलं आहे.
मग फडणवीस-मिंध्यांचे सरकार काय कामाचे?
याशिवाय अग्रलेखातून सरकावर जोरदार टीका करण्यात आली असून, शेतकरी कर्जमाफी, विधिमंडळ अधिवेशन, पाणी टंचाई या मुद्यांना घेऊन सरकारला जाब विचारण्यात आला आहे. ‘आमदार-खासदार’ हाच सध्या ‘माल’ झाला असून या ‘माला’ला जोरदार हमीभाव मिळत आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षांकडे तुफान पैसा आहे, पण शेतकऱ्यांना मात्र या मंडळींनी वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. मग फडणवीस-मिंध्यांचे सरकार काय कामाचे? विदर्भ, मराठवाडा दुष्काळाच्या संकटात आहेत. बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे, असंही म्हटलं आहे.
कारण विरोधी पक्षनेता सरकारचे वस्त्रहरण करतो
81 लाख लाडक्या बहिणींचे पैसे बंद केले आहेत. निवडणुका संपताच राज्यकर्त्यांनी बहिणींना वाऱ्यावर सोडले. लोकशाहीत विरोधी पक्षनेत्याचे स्थान हे महत्त्वाचे आहे. आज महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळ सभागृहांत विरोधी पक्षनेता नाही. कारण विरोधी पक्षनेता सरकारचे वस्त्रहरण करतो, प्रश्न विचारतो अशी भीती सत्ताधाऱ्यांना आहे. लोकशाहीचे हे अधःपतन आहे. असे म्हणत सरकाराला जाब विचारला आहे.
हेही वाचा : Anna Hazare : अण्णा हजारेंचे 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य; पक्षांतरे का केली जातात? सांगितलं कारण…





