जानेवारीमध्ये विकसित भारत युवा नेतृत्व परिसंवाद; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी दिली माहीती

नवी दिल्ली – जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत विकसित भारत युवा नेतृत्व परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान नररेंद्र मोदी यांनी आज जाहीर केले. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या दर महिन्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहीती दिली.
राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या युवकांना जोडण्याच्या आपल्या उपक्रमाचा भाग म्हणून हा परिसंवाद आयोजित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. दिनांक ११ – १२ जानेवारीला हा परिसंवाद नवी दिल्लीत होणार आहे.
राजकीय वारसा नसलेल्या युवकांना राजकारणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आपण लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात केले होते, याची आठवण देखीलपंतप्रधानांनी करून दिली. असा एक लाख युवकांना राजकारणाशी जोडण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्याचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. एनसीसीमधून युवकांमध्ये नेतृत्व, शिस्त आणि सेवाभाव जागवला जातो असेही त्यांनी सांगितले. ज्येष्ठांचा हयातीचा दाखला डिजीटली सादर करणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करणाऱ्या युवकांची उदाहरणेही त्यांनी सांगितली.
गयानामध्ये १८० वर्षांपुर्वी गेलेल्या मूळ भारतीयांनी भारतीय संस्कृतीचे जतन करत तेथील समाजासाठी राजकारण, उद्योग, शिक्षण किंवा संस्कृतीच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. भारतातून जगभरात स्थलांतरित झालेल्या, स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालेल्या आणि विदेशांमध्ये भारतीय संस्कृती जतन करण्यास मोलाचे योगदान दिलेल्या हजारो मूळ भारतीयांच्या प्रेरक आठवणी गोळा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी जनतेला केले.
गयाना प्रमाणे ओमानमध्ये स्थायिक झालेल्या मूळ भारतीयांनी केलेल्या कामाचाही त्यांनी गौरव केला. ऊपकाक लुरू करण्यात आलेल्या एक पेड मां के नाम या उपक्रमाचे अनुसरण करण्यात येत आहे. या उपक्रमातून देशभरात गेल्या पाच महिन्यात १०० कोटी वृक्षांची लागवड झाल्याचेही मोदींनी सांगितले.
स्वच्छता अभियानातून सरकारी कार्यालयातील कालबाह्य फायलींचा कचरा काढून टाकला गेला आहे. कपड्यांच्या चिंध्यांपासून दोन युवती फॅशन उत्पादने तयार करतात. काही युवकांनी अरुणाचल प्रदेशातील नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा उपक्रमही राबवला आहे. तसेच पक्षांची घरटी करण्याची कार्यशाळाही काही नागरिकांकडून घेतली जात असल्याची उदाहरणेही पंतप्रधांनी यावेळी सांगितली.





