नवी दिल्ली : महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी गुरुवारी घोषणा केली की, सरकार ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या थीमसह राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा करेल. ८ मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व राष्ट्रीय, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय सीमा ओलांडून महिलांच्या कामगिरीची ओळख पटवण्यासाठी एक जागतिक प्रसंग म्हणून अधोरेखित केले असून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२५ हे वर्ष विशेष महत्त्वाचे आहे. हे वर्ष बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंचाच्या ३० व्या वर्धापन दिनाचे चिन्ह आहे. बीजिंग घोषणापत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवजअसून त्यामुळे जगभर जागतिक महिला हक्कांच्या विषयात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. या घोषणेमुळे कायदेशीर संरक्षण, सेवांमध्ये प्रवेश, युवकांचा सहभाग आणि कालबाह्य सामाजिक नियम आणि रूढीवादी कल्पना नष्ट करण्यात प्रगती झाली आहे. भारतात, सरकार विविध धोरणे, योजना आणि कायदेविषयक उपाययोजनांद्वारे महिला सक्षमीकरण आणि लिंग समानतेसाठी सक्रियपणे काम करत आहे. भारतीय महिलांची प्रगती १. बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे शिक्षणात लिंग समानता सुधारली २. उच्च शिक्षणात महिलांची नोंदणी २.०७ कोटी ३. विज्ञान ज्योती आणि ओव्हरसीज फेलोशिप स्कीममुळे मुलींसाठी स्टेम शिक्षणाला प्रोत्साहन ४. पंतप्रधान मातृ वंदना योजना आणि पोषण अभियानमुळे माता आणि बाल आरोग्य सुधारले ५. माता मृत्युदर कमी ६. महिलांचे आयुर्मान ७१.४ वर्षांपर्यंत वाढले ७. पंतप्रधान जन धन योजना, मुद्रा योजनेमुळे महिला उद्योजक सक्षम ८. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत १० कोटींहून अधिक महिला स्वयं-मदत गटांशी जोडल्या