शिवरेत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’; खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाणे वाटप

नसरापूर (भोर), : भोर तालुक्यातील शिवरे गावात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाणे आणि कीडनाशकांचे वाटप करण्यात आले. शिवरेतील ९० आणि रांजे गावातील १२, अशा एकूण १०२ शेतकऱ्यांना उन्नत बियाणे आणि औषधांचा लाभ मिळाला.
राहुरी कृषी विद्यापीठाचे निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी सोयाबीन पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आधुनिक पेरणी पद्धती, कीड-रोग व्यवस्थापन आणि वैज्ञानिक शेती तंत्रांवर मार्गदर्शन केले. खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि शेती उत्पादनवाढ ही माझी प्राथमिकता आहे.”
कार्यक्रमाला राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. समी रेड्डी, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे, ऊस शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. पवार, विषयतज्ज्ञ संतोष करंजे आणि संतोष गोडसे, सरपंच अमृता गायकवाड, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी भूषण पुरोहित उपस्थित होते. केळवडे, कांजळे, शिवरे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सूत्रसंचालन संतोष करंजे यांनी, तर आभार भूषण पुरोहित यांनी मानले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने प्रोत्साहन मिळेल.




