ZP Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (ZP Election) शिवसेनेने आता कंबर कसली असून ‘आर या पार’ची भूमिका घेत थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील २२ जिल्ह्यांची (ZP Election) जबाबदारी त्यांच्या प्रमुख मंत्र्यांवर सोपवली असून, “जिंकाच, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट आणि आक्रमक संदेश दिला आहे. मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीतीचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी प्रत्येक ‘संपर्क मंत्र्याकडे’ दोन जिल्ह्यांची धुरा सोपवत ‘मिशन भगवा’ यशस्वी करण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या जबाबदारीनुसार गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, तर योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर जिल्ह्याचे काम सोपवण्यात आले आहे. ZP Election प्रकाश आबिटकर नांदेड व हिंगोली पाहतील, तर भरत गोगावले यांच्याकडे बीड आणि आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी असेल. विदर्भात प्रताप सरनाईक अमरावती व अकोला, संजय राठोड यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव नागपूर व वर्धा, तर शंभुराज देसाई गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पक्षाची ताकद वाढवतील. तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांवर भगवा फडकवण्याचे लक्ष्य शिंदेंनी नेत्यांसमोर ठेवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ निवडणुका (ZP Election) जिंकण्याचेच नव्हे, तर पक्ष विस्तारण्याचेही धाडसी संकेत दिले आहेत. त्यांनी नेत्यांना प्रत्येक जिल्ह्यात विजयाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना पूर्ण ताकद देण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे, ज्या जिल्ह्यांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप किंवा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पालकमंत्री आहेत, तिथेही शिवसेनेने मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना स्थान मिळवून द्यावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. शिवसेनेचे हे “संपर्क मंत्री अभियान” म्हणजे केवळ निवडणूक पूर्व तयारी नसून, स्थानिक सत्तेवर थेट कब्जा मिळवण्यासाठी राबवलेली एक आक्रमक मोहीम आहे. संघटन, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी सक्रिय होत शिवसेनेने आता विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते, सचिव आणि मंत्री प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. आता शिवसेनेचा हा राजकीय धडाका येणाऱ्या निवडणुकीत किती प्रभावी ठरतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.