राजगुरुनगर : खेड तालुक्यातील खरपुड गावात आदिवासी संस्कृती जतन व पर्यावरण संरक्षणासाठी युवकांनी एकजुटीने निर्धार व्यक्त केला. ‘जंगल वाचवा – संस्कृती जपा’ या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. या उपक्रमात सुमारे 140 मुलांसह 50 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आदिवासी समाजातील पारंपरिक प्रथा, रूढी आणि सांस्कृतिक वारसा हळूहळू लोप पावत असल्याची जाणीव झाल्याने हा उपक्रम राबविण्यात आला. बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढी निसर्ग आणि परंपरेपासून दूर जात असल्याच्या पार्श्वभूमीवर युवक-युवतींनी पुढाकार घेत जंगल, जमीन, पाणी आणि संस्कृती जतन करण्याचा सामूहिक संकल्प केला. खरपुड येथे आयोजित एकदिवसीय जनजागृती कार्यक्रमात भोमाळे वरचे, भोमाळे खालचे, येळवळी, भोरगिरी, भिवेगाव, खरपुड, म्हसेवाडी आणि पढरवाडी येथील ग्रामस्थ सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान युवक-युवती व विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती फेरी काढत जंगल वाचवा – संस्कृती जपा, स्वच्छ गाव – प्रदूषणमुक्त गाव अशा घोषणा दिल्या. या उपक्रमाचे आयोजन सर्व संबंधित गावांतील ग्रामस्थ, युवक व युवती यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास कल्पवृक्ष संस्था चे सभासद उपस्थित होते. जुन्नर येथील डी. बी. भांगे यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्त्व, परंपरांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची गरज यावर मार्गदर्शन केले. होळीच्या सुट्टीत गावी आलेल्या विद्यार्थ्यांनी विशेष उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी पारंपरिक पद्धतीने ‘कोकाट होळी’ साजरी करण्यात आली. जंगल, जमीन, पाणी हिच आमची खरी कहाणी या घोषणांमधून सांस्कृतिक अभिमान व पर्यावरणाबद्दलची बांधिलकी व्यक्त झाली. या उपक्रमामुळे तरुण पिढीत आदिवासी संस्कृती जतन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत लक्षणीय जागृती निर्माण झाल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांची मालिका राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.