सानुग्रह अनुदानाविना निराधारांची फरफट

अंध, अपंगांवर आर्थिक संकट : खासदार सुळे करणार पाठपुरावा
इंदापूर : अंध, अपंग, विधवा व निराधारांना केंद्र शासनाच्या माध्यमातून दरमहा दिले जाणारे अनुदान एप्रिल 2022 पासून रखडले आहे. समाजातील या उपेक्षित घटकावर ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक संकट आले आहे. दरम्यान या प्रश्नामध्ये लक्ष घालून निराधारांना आधार द्यावा, या मागणीसाठी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले आहे.
केंद्र व राज्य शासनाने अंध, अपंग, विधवा, वृद्ध या घटकांसाठी विविध योजना आणल्या. त्यामध्ये राज्य व केंद्राचा प्रत्येकी 50 टक्के वाटा दिला जातो. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतून वृद्धांना दरमहा 400 रुपये तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, विधवा योजनेतून निराधारांना दरमहा 600 रुपयांचे मानधन दिले जाते.
वास्तविक पाहता या मानधनावर महागाईच्या काळात उपजीविका भागवणे अशक्य आहे. अशातच गेल्या एप्रिल महिन्यांपासून केंद्र शासनाच्या हिश्याचे अनुदानच मिळालेले नाही. त्यामुळे राज्यभरातील अंध, अपंग, वृद्ध व विधवा लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान मिसाळ यांचे निवेदन स्वीकारताना खासदार सुळे म्हणाल्या, आपण तातडीने याबाबत केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून निराधारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.





