Pune District : खेड तालुक्यात भीमाशंकर असूनही पर्यटन विकास रखडला!
Pune District : पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये वर्षभर वाहणारे झरे आणि त्यातून निर्माण होणारे धबधबे हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकते.

राजगुरुनगर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असतानाही खेडमधून भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी सक्षम आणि थेट मार्ग नसल्याने या भागाच्या पर्यटन विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वनविभागाच्या हद्दी, भीमाशंकर अभयारण्यातील पर्यावरणीय निर्बंध, रस्ते विकासातील अडथळे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय मतभेद यामुळे निसर्गसंपन्न पश्चिम खेडला पर्यटनाच्या नकाशावर अपेक्षित स्थान मिळालेले नाही.
भीमाशंकर, भोरगिरी आणि परिसराला धार्मिक, ऐतिहासिक तसेच निसर्ग पर्यटनाची मोठी क्षमता आहे. भोरगिरी येथील श्री कोटेश्वर मंदिर, भोरगडातील प्राचीन लेणी, येळवळी, भिवेगाव, कारकुडी, मंदोशी, मोरोशी परिसरातील धबधबे, वांद्रा, खरपूड व वरचे भोमाळे येथील निसर्गसौंदर्य, वाडा येथील दगडात कोरलेले गडदुबाई मंदिर, कडधे येथील श्री खंडेराया मंदिर तसेच चास-कमान आणि कळमोडी धरण यामुळे धार्मिक, ऐतिहासिक, साहसी, निसर्ग आणि जलपर्यटनाचा एकत्रित पट्टा विकसित होऊ शकतो.
पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये वर्षभर वाहणारे झरे आणि त्यातून निर्माण होणारे धबधबे हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकते. पावसाळ्यानंतरही काही धबधबे ऑक्टोबरपर्यंत सुरू राहत असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई तसेच औद्योगिक पट्ट्यातील पर्यटकांना हा परिसर खुणावतो. मात्र सुरक्षित रस्ते, वाहनतळ, स्वच्छतागृहे, दिशादर्शक फलक, सुरक्षाव्यवस्था आणि आवश्यक पर्यटन सुविधा अपुर्या असल्याने या संधीचा पुरेपूर उपयोग झालेला नाही. अनेक गावांना रस्ते जोडले गेले असले तरी देखभालीअभावी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अरुंद मार्ग आणि पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे स्थानिकांसह पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही भागांत मोबाईल नेटवर्कची सुविधाही मर्यादित असल्याने पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक संपर्कव्यवस्थेलाही अडथळे येतात.
खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्यातील सुमारे 35 ते 40 गावांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्रीवरील कायदेशीर निर्बंधांमुळे जमीन हा आर्थिक विकासाचा सहज वापरता येणारा आधार ठरत नाही. त्यामुळे हॉटेल, घरगुती निवास, दुकाने, पर्यटन मार्गदर्शन, वाहनसेवा, स्थानिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला अशा पूरक व्यवसायांना अपेक्षित गती मिळालेली नाही. काही कुटुंबांनी पर्यटकांसाठी घरगुती निवास व जेवणाची सुविधा सुरू केली आहे. मात्र या सुविधा अद्याप मर्यादित आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने घरगुती निवास, स्थानिक खाद्यसंस्कृती, प्रशिक्षित मार्गदर्शक आणि ग्रामपर्यटन विकसित केल्यास स्थानिकांना थेट रोजगार मिळू शकतो.
खेड तालुक्यात ज्योतिर्लिंग भीमाशंकर असूनही पश्चिम भागातून भीमाशंकरपर्यंत सर्व ऋतूंमध्ये वापरता येईल असा सक्षम थेट मार्ग नसल्याची स्थानिकांची प्रमुख तक्रार आहे. पूर्वीपासून वनविभागाशी संबंधित अडचणी या मार्गाच्या विकासासमोर होत्या. त्यानंतर भीमाशंकर अभयारण्यातील वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाचे निकष अधिक महत्त्वाचे ठरले. या परिसरातील महत्त्वाचा वन्यजीव असलेल्या शेकरूचे अधिवास सुरक्षित ठेवत कोणताही रस्ता विकास करणे आवश्यक आहे.
खेड-आंबेगाव परिसरातील राजकीय मतभेदांचाही या प्रश्नावर परिणाम झाल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जातो. आंबेगावच्या बाजूने भीमाशंकरकडे जाणार्या मार्गावर पायाभूत सुविधा विकसित झाल्या; मात्र खेडच्या बाजूचा मार्ग अपेक्षित वेगाने विकसित झाला नाही, अशी स्थानिकांची भावना आहे. या संदर्भात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांचा उल्लेख स्थानिक चर्चेत केला जातो. मात्र रस्ते विकासाबाबत पर्यावरणीय, प्रशासकीय आणि कायदेशीर बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ज्योतिर्लिंगाची भूमी, प्राचीन लेणी, डोंगर-दर्या, धबधबे आणि समृद्ध आदिवासी संस्कृती अशी मोठी नैसर्गिक व सांस्कृतिक संपत्ती पश्चिम खेडकडे आहे. त्यामुळे प्रश्न केवळ रस्त्याचा नसून या संपूर्ण परिसराला पर्यावरणपूरक पर्यटनाच्या माध्यमातून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आहे. ‘भोरगिरी-भीमाशंकर’ मार्गासह पायाभूत सुविधा आणि स्थानिक रोजगाराचा सर्वंकष आराखडा कधी तयार होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘भोरगिरी-भीमाशंकर’ पर्यटन मार्गाची गरज
पर्यावरणाचे संरक्षण करत पर्यटनाला चालना देण्यासाठी भोरगिरी ते भीमाशंकर असा नियोजनबद्ध पर्यटन मार्ग विकसित करण्याची मागणी पुढे येत आहे. अभयारण्यातील जैवविविधतेला धक्का न लावता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर, सार्वजनिक वाहतूक, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, मोबाईल नेटवर्क, पर्यटक सुरक्षा, वाहनतळ आणि स्वच्छतागृहे अशा सुविधांचा एकत्रित विचार करण्याची गरज आहे. धबधबे आणि निसर्गस्थळांवर अनियंत्रित गर्दी होऊ नये यासाठी पर्यटकांची वहनक्षमता निश्चित करून प्रवेशव्यवस्था, सुरक्षा कर्मचारी, प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक आदिवासी युवकांना पर्यटन व्यवसायाचे प्रशिक्षण, सुलभ कर्ज, स्वयं-सहायता गटांच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी आणि नियमानुसार उपलब्ध जमीन वापराच्या पर्यायांचा विचार केल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते.
पर्यावरण संरक्षणातूनच पर्यटन विकास
पश्चिम खेडचा विकास करताना अभयारण्य आणि वनक्षेत्राचे संरक्षण बाजूला ठेवून केवळ बांधकामाला प्राधान्य देणे योग्य ठरणार नाही. पर्यावरण संवर्धनालाच पर्यटन विकासाचा आधार बनवून पर्यावरणपूरक पर्यटनाचे मॉडेल उभारण्याची गरज आहे. ग्रामस्थ, वनविभाग, पर्यटन विभाग, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून दीर्घकालीन आराखडा तयार केल्यास विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधता येऊ शकतो.भीमाशंकरच्या धार्मिक पर्यटनासोबत भोरगिरीचा इतिहास, प्राचीन लेणी, धबधबे, डोंगररांगा, धरणे, मंदिरे आणि आदिवासी संस्कृती यांना एका पर्यटन साखळीत जोडल्यास पश्चिम खेडची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण होऊ शकते. त्यातून स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना घरगुती व्यवसाय, शेतकर्यांना पूरक उत्पन्न आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक संधी मिळू शकतात.
खेड पश्चिम भागाच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा तालुक्यातील राजकीय नेत्यांची राहिलेली नाही. या भागातील गावागावांतील युवक सामाजिक विकासाऐवजी स्वतःपुरते मजबूत होण्यावर भर देत आहेत. परिणामी विकास बाजूला पडून गटातटाचे राजकारण आणि सुप्त संघर्ष वाढत आहे. जातीपातीचा समाजविघातक विचार ही पश्चिम भागाच्या विकासासाठी मोठी शोकांतिका ठरत आहे.
– पांडुरंग जठार, माजी सरपंच, ग्रामपंचायत धुवोली





