Bhuinj News: भक्कम लोकप्रतिनिधित्व असूनही ‘भुईंज’ खड्ड्यात? श्रेयवादाच्या लढाईत गावचा विकास स्वाहा
Bhuinj News: रस्त्यांची चाळण, अस्वच्छता अन् मूलभूत सुविधांचा बोजवारा; श्रेयवादाच्या राजकारणात भुईंजमधील सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप.

Bhuinj News – समृद्ध धार्मिक-ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईंज गावाच्या विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावाला भक्कम लोकप्रतिनिधित्व लाभलेले असतानाही अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रश्नांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे भुईंजचा विकास नेमका खुंटला कुठे? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. गावातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्डे,
अस्वच्छता आणि अपुर्या नागरी सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव ही देखील एक गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या आणि भुईंजचे धार्मिक, सामाजिक व आर्थिक महत्त्व लक्षात घेता या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. भुईंजमधील प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, कृषी कार्यालय आणि महावितरण कार्यालय या महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांच्या सुविधां बाबतही नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही कार्यालये अत्यंत महत्त्वाची असताना त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि सक्षम व्यवस्था मिळणे गरजेचे आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत असून प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था सुधारण्या बरोबरच शासकीय कार्यालये अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.
श्रेयवादाच्या राजकारणात विकासाचा बळी?
गावातील विकासकामांवरून श्रेय घेण्याची स्पर्धा होत असेल, तर त्याचा थेट परिणाम विकासाच्या गतीवर होऊ नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. कामाचे श्रेय कोणाला मिळते यापेक्षा काम प्रत्यक्षात कधी पूर्ण होते, हे महत्त्वाचे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि प्रशासनातील संबंधित विभागांनी एकत्रितपणे भुईंजच्या समस्यांचा आढावा घेऊन प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज आहे. रस्ते, आरोग्य, स्वच्छता, पाणी, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शासकीय कार्यालयांच्या पायाभूत सुविधा या प्रश्नांवर ठोस कृती होणे अपेक्षित आहे.





