उपायुक्त की मालकीणबाई? घरकाम, मसाज अन् धमक्या, सफाई कामगाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक समाज कल्याण विभागातील उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्यावर सफाई कामगार कौशल्या गायकवाड यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
जयश्री सोनकवडे यांनी शासकीय ड्युटीवेळी आपल्या घरी भांडीकुंडी, फरशी स्वच्छता आणि स्वतःसह त्यांच्या आईच्या मसाजसाठी सक्ती केल्याचा दावा कौशल्या यांनी केला आहे. विरोध केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे आणखी बळ मिळाले आहे, ज्यामुळे समाज कल्याण विभागातील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कौशल्या गायकवाड या 2023 पासून समाज कल्याण विभागाच्या वसतिगृह यूनिट क्रमांक 4 मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, जयश्री सोनकवडे यांनी त्यांना ड्युटीवेळी घरी बोलावून वैयक्तिक कामे करायला लावली. यामध्ये घरातील स्वच्छता आणि मसाज यांचा समावेश होता.
कौशल्या यांनी पुरावे म्हणून सादर केलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात कौशल्या यांना सोनकवडे यांच्या घरी स्वच्छता आणि मसाज करताना दिसत आहे. या पुराव्यांमुळे जनमानसात संताप पसरला असून, प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
जयश्री सोनकवडे यांचे प्रत्युत्तर
जयश्री सोनकवडे यांनी हे आरोप खोडसाळ आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, त्यांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ बेकायदेशीररित्या व्हायरल केले गेले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले असून, येत्या काळात याबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणाने समाज कल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांवर असे गंभीर आरोप प्रथमच झाले नसले, तरी यामुळे विभागाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.





