मुंबई : महाकुंभमध्ये येण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ही श्रद्धा आणि एकोप्याची भूमी आहे. आम्ही आज त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. हा महाकुंभ शुद्ध आहे आणि 144 वर्षांनंतर होत आहे. येथील व्यवस्था अतिशय उत्तम आहे. त्यात स्वतः योगी आदित्यनाथ यांच्यासह युपी सरकारची संपूर्ण टीम कार्यरत आहे. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या दूरदृष्टीसाठी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रयागराजमधून सकारात्मकता ऊर्जा घेऊन जाणार असल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील काही आमदार आणि खासदारांसह प्रयागराज येथे गेले आहेत. या ठिकाणी सुरू असलेल्या महाकुंभमध्ये एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब त्रिवेणी संगमात स्नान केले. महाकुंभात अमृतस्नान केल्यानंतर त्यांनी राज्यातील सफाई कर्मचाऱ्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक केले. विश्वामध्ये सगळ्यात मोठा आणि अद्भूत महाकुंभ होत आहे. 60 कोटी लोक याठिकाणी येऊन गेले आहेत. हा मोठा गिनीज बुक रेकॉर्ड आहे. या ठिकाणी आलेल्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सफाई कर्मचारी, मोठ्या अधिकाऱ्यांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: महाकुंभच्या नियोजनात जुडलेली आहेत. त्यांच्या संपूर्ण टीमकडून उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाकुंभच्या नियोजनाचे कौतुक केले. प्रयागराजमध्ये हेलिकॉप्टरने आल्यानंतर चहुबाजूने भाविक दिसून आले. या ठिकाणी जनसागर उसळलेला दिसतो. हे दृष्य अद्भूत आहे. महाकुंभमध्ये आतापर्यंत 60 कोटी लोकांनी स्नान केले. याचा अर्थ आतापर्यंत देशातील अर्धी लोकसंख्येने महाकुंभमध्ये स्नान केले. येथून गेल्यानंतर ते लोक गंगा मातेचे पाणी घेऊन जातील आणि इतरांना देतील. यावरून संपूर्ण देशात महाकुंभातील पवित्र ऊर्जा पोहोचणार आहे. देशाला महासत्ता बनवण्यासोबतच अध्यात्मिक प्रतिष्ठान, सामाजिक प्रतिष्ठान, आपली संस्कृती, आपली परंपरा पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असेही ते म्हणाले.