Pune News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टिळक कुटुंबियांच्या सांत्वनाला..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतीयांच्या मनातील खदखद आज खऱ्या अर्थाने ऑपरेशन महादेवच्या यशस्वितेतून संपली आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. केसरीचे विश्वस्त आणि संपादक डॉ. दीपक टिळक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शिंदे पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
लाडक्या बहिणींचे कुंकू पुसण्याचे पाप ज्या दहशतवाद्यांनी केले होते, त्यांना जशास तसे उत्तर देऊ, गोली का बदला मिसाइल से, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ते उत्तर दिले गेले. त्यासाठी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन आहेच; परंतु ज्यांनी प्रत्यक्ष हा गोळीबार केला, त्यांना यमसदनी पाठवण्याची इच्छा भारतीयांनी व्यक्त केली होती, ती ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. भारतीय सैन्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यामुळे लष्कराचेही मी अभिनंदन करतो, असे शिंदे यांनी नमूद केले.
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे नुकतेच निधन झाले. ही दु:खद घटना आमच्या सगळ्यांसाठीच आहे. संपादक, पत्रकार म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळक आणि केसरी हे स्वातंत्र्यासाठी लढले. हा वारसा टिळक परिवार पुढे नेत आहे, त्याचा आम्हांला अभिमान आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या जाण्याचे पत्रकारिता साहित्यिक आणि मराठी संस्कृती यात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.





