उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अमित शहांना पत्र; इथेनॉल निर्मिती बंदीमुळे ऊस उत्पादक अडचणीत

नागपूर – केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी केंद्राच्या या निर्णयामुळे साखर कारखानदारांसह ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे म्हटले आहे.
इथेनॉल निर्मितीत ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक साखर कारखान्यांनी केली आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती बंदी लागू झाली तर कारखान्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे, असे अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सरकारने घेतलेला निर्णय ग्राहक आणि अन्नपुरवठा विभागाच्या दृष्टीने योग्य असला तरी ऊसाच्या उद्योगात हजारो शेतकरी गुंतलेले आहेत. त्यामुळे या निर्णयाचा केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी अजित पवारांनी या पत्राद्वारे केली आहे.
इथेनॉल प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक कारखानदार ऊसापासून इथेनॉल बनवत असल्यामुळे साखर कारखानदार अडचणीत येण्याची शक्यता असल्याची अजित पवार यांनी गडकरींना माहिती दिली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात उद्रेक आहे हा मुद्दा देखील केंद्रीय नेत्यांच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
जयंत पाटलांनीही उपस्थित केला मुद्दा !
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात इथेनॉलबंदीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभर फिरून सांगत आहेत की, आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचवत आहोत.
मात्र हेच गडकरी बैठकीत नसताना नुकतेच केंद्र सरकारने उसापासून तयार करण्यात आलेले इथेनॉल न घेण्याचा निर्णय घेतला. तुम्हीच व्याजदर कमी करून कर्ज देत इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले होते. मात्र आता साखरेचा भाव वाढतोय, हे लक्षात येताच इथेनॉल बंदी केली. सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचे ठरवले आहे.





