Indapur : शेतकर्यांच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा करा – खासदार सुळे
Indapur : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील लाकडी, म्हसोबाचीवाडी, निरगुडे आणि शेटफळगढे या गावांना भेट देऊन सुळे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

इंदापूर : दुष्काळाच्या तीव्र झळांनी इंदापूर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामीण जनता होरपळत असताना सरकारकडून अद्याप अपेक्षित मदत मिळालेली नाही. दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आला असतानाही शेतकर्यांच्या हातात पैसा नाही, जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही आणि अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सरकारने केवळ दुष्काळ जाहीर करून थांबू नये, तर अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये आणि नमो किसान सन्मान योजनेचे चार हजार रुपये, असे एकूण नऊ हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात तातडीने जमा करावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील लाकडी, म्हसोबाचीवाडी, निरगुडे आणि शेटफळगढे या गावांना भेट देऊन सुळे यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, सिंचनासाठी पाण्याची अनुपलब्धता आणि जनावरांच्या चार्याची कमतरता याबाबत ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडल्या. इंदापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला असला, तरी प्रत्यक्षात शेतकर्यांच्या हातात मदतीची रक्कम पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने पिकांचे नुकसान होत असून पशुधनाच्या चार्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. गरज असलेल्या गावांमध्ये तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुळे यांनी केली. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष कृती करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, सागर मिसाळ, अमोल भिसे, इनायत काझी, छायाताई पडसळकर यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवाळीपूर्वी पैसे जमा करा!
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण असला, तरी दुष्काळामुळे शेतकर्यांच्या घरात चिंतेचे सावट आहे. शेतीचे नुकसान, वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये आणि नमो किसान सन्मान योजनेचे चार हजार रुपये, असे एकूण नऊ हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात तातडीने जमा करावेत. दुष्काळी मदत देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीही त्वरित पूर्ण करावी. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळाल्यास शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.
राजकारण बाजूला ठेवून मदतीसाठी पुढे या
दुष्काळाचे संकट हे केवळ एका शेतकर्याचे किंवा एका गावाचे नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. अशा वेळी सामाजिक संस्था, सहकारी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन शेतकर्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. शेतकर्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, सरकारनेही शेतकर्यांच्या वेदना समजून घेत तातडीने मदत देण्यासाठी कार्यवाही करावी. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.





