जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचे विभाग बदलणार

सातारा -जिल्हा परिषद, पंचायत समितीत सध्या बदल्यांचे सत्र सुरु असून प्रशासकीय, आपसी, विनंती बदल्यानंतर आता एकाच विभागात पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या एका विभागातून दुसऱ्या विभागात होणार असून सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पदोन्नती, बदली प्रक्रियांमधील त्रुटी दूर करुन अर्थ विभागातील रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. आता एकाच विभागात पाच वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांची अन्य विभागात बदली होणार आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या संवर्गातील एकाच विभागात पाच वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्य विभागात होणार आहेत. ही बदल्यांची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यास अनेक विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांची बदली होऊन कामकाजात ढिलाई येण्याची शक्यता आहे. याबाबत ज्ञानेश्वर खिलारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कामकाजात विस्कळीतपणा येण्याची शक्यता
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यातच सध्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पाच वर्षे एकाच विभागात काम केलेल्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यास अनेक विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात काम करावे लागणार आहे. बदली झालेल्या विभागामध्ये कामाचा अनुभव सर्वच कर्मचाऱ्यांना असेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे या बदल्यांची प्रक्रिया झाल्यास काही महिने तरी कामकाजात विस्कळितपणा येण्याची शक्यता आहे.
==============





