Pune District | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग धूळखात

बारामती : बारामती शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली आहे. शासकीय यंत्रणा तसेच विभाग प्रमुखांच्या उदासीनतेमुळे बारामतीकरांना या रुग्णालयातील सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. महाविद्यालयातील काही विभाग धूळखात पडून आहेत. महाविद्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर आहे. सुस्त प्रशासनाचा फटका बारामतीकरांना बसत आहे. विभाग प्रमुखांचा मनमानी कारभार सुरू असून याला चाप बसणार का, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याच्या धर्तीवर या शासकीय महाविद्यालयाची उभारणी झाल्या असली तरी देखील पाच वर्षांचा कालावधी उलटूनही वैद्यकीय महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याची खंत व्यक्त होत आहे. न्याय व वैदिक विभागावर देखील रोष व्यक्त होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दि. ७ व ८ डिसेंबर रोजी न्याय व वैदक विभागामार्फत परिषदेचे आयोजन केले आहे. शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये परिषदेला येणाऱ्या डॉक्टर मंडळींची जंगी सोय केली आहे.
महाविद्यालय व रुग्णालय सुरू होऊन ५ वर्षे झालेली आहेत. परिषद आयोजित केलेल्या विभागामार्फत आजपर्यंत त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या किमान पोस्ट मार्टम सुविधा या भव्य दिव्य इमारतीमध्ये करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही हे वास्तव आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे हा विभाग धूळखात पडून आहे. अत्यंत सुसज्ज इमारती, आवश्यक त्या भौतिक सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु अकार्यक्षमतेमुळे रुग्णालयाचा उपयोग सर्वसामान्यांना होताना दिसत नाही. या ठिकाणी मृतदेहाच्या शवविच्छेदनाची व्यवस्था नसल्याने त्यासाठी रुई अथवा सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात मृतदेह हलवावा लागतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये शवविच्छेदन केले जाते. डॉक्टरांनी लिहून दिलेली अनेक औषधे येथे मिळत नाहीत. ती बाहेरून मेडिकलमधून घ्यावी लागतात, अशा तक्रारी वाढत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवारांच्या सूचना धुडकावल्या
राज्यात आणि देशात जे उत्तम आहे ते बारामतीत आणण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच करत असतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला. कोट्यवधींची यंत्रसामग्री त्यांच्या माध्यमातून रुग्णालयाला मिळाली. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र आहे. आठवड्यातील किती दिवस अधिकारी महाविद्यालयात उपस्थित असतात, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार हे वारंवार याबाबत वैयक्तिक तसेच जाहीर सूचना देत असतात. मात्र अधिकारी त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.





