Dengue Outbreak: मावळच्या शिवली गावात डेंग्यूचा विळखा? १८ रुग्ण पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा अलर्टवर
Dengue Outbreak: मावळ तालुक्यातील शिवली गावात ताप आणि डेंग्यूसदृश लक्षणांमुळे नागरिक बेजार; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून गावात विशेष सर्वेक्षण सुरू.

Dengue Outbreak – तालुक्यातील पवन मावळ भागातील शिवली गावात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, गावात मोठ्या संख्येने नागरिक ताप आणि डेंग्यूसदृश लक्षणांनी बाधित झाले असून अनेक जणांनी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.
गावातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मावळचे गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा दिवसांपासून गावात ३० पेक्षा जास्त तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून अनेकांना डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आली आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता,
डास नियंत्रण उपाययोजना आणि परिसर स्वच्छतेबाबत पुरेशी दक्षता घेतली गेली नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. नियमितपणे ग्रामपंचायतीला कर भरूनही आरोग्यविषयक संकटाच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. वाढत्या नाराजीनंतर आरोग्य विभागाने गावात विशेष मोहीम सुरू केली आहे. मावळ तालुका आरोग्य अधिकारी सुवर्णा आरोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही संशयित रुग्णांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आतापर्यंत गावातील १८ रुग्णांमध्ये डेंग्यूची लागण झाल्याची नोंद झाली असून त्यांपैकी काही रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू असून तापग्रस्त नागरिकांची तपासणी केली जात आहे. ज्या ठिकाणी डासांच्या अळ्या आढळत आहेत, तेथील पाणीसाठे नष्ट करण्यात येत आहेत. गावात धूर फवारणीचा एक टप्पा पूर्ण झाला असून नागरिकांनी पाणी साठवून ठेवू नये तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीवर होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना शिवलीचे ग्रामसेवक अनंतकुमार होळकर यांनी सांगितले की, गावात प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत पाच वेळा औषध फवारणी करण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या सर्व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपाययोजनांची माहिती दिली जात आहे.
“प्रशासनाने पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून संपूर्ण गावात नियमित औषध फवारणी सुरू करावी. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केला आहे, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.”
– दिपक आडकर, ग्रामस्थ, शिवली






