Swargate Metro Station : स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टी हब मेट्रो स्टेशनला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदन दिले आहे. दरम्यान, याप्रसंगी हर्डीकर यांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे. स्वारगेट हे पुणे शहरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून बसस्थानक, मेट्रो सेवा आणि इतर प्रवासी सुविधांचा एकत्रित संगम येथे होणार आहे. त्यामुळे हे ठिकाण ‘मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकसित होत आहे. अशा महत्त्वाच्या ठिकाणाशी दिवंगत अजित पवार यांचे नाव जोडणे ही त्यांच्या कार्याला योग्य आदरांजली ठरेल, असेही सुरवसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.