Pune News : गाडी हळू चालवा.! ‘दाम्पत्याला बेदम मारहाण, ३ वर्षांचा मुलगा जखमी’; कॅबचालाकासह चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला.

Pune News : वाघोली येथे एका दांपत्याला कार चालकाला “गाडी हळू चालवा” असे सांगणे महागात पडले. किरकोळ वादानंतर कारमधील व्यक्तींनी रस्त्यातच पती-पत्नीला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही जखमी झाला.
या प्रकरणी, वाघोली पोलिसांनी कॅबचालकासह चौघांच्या विरु्दध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शांतनू शुक्ला यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.27) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शुक्ला दांपत्य आपल्या तीन वर्षांच्या मुलासह अहिल्यानगर रोड वाघोली येथील डिकेथलॉनच्या समोरून दुचाकीवरून घरी निघाले होते.
सोयरीक गार्डन चौकात यू-टर्न घेत होते. त्याचवेळी खराडीच्या दिशेने भरधाव वेगाने एक कॅबचालक येत होता.त्याला शुक्ला यांनी गाडी हळू चालव असे सांगितले. त्या कारणातून दोघांत बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेला.
त्यावेळी कॅब चालकाने आणि त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी आपल्यासह पत्नीला मारहाण केल्याचा शुक्ला यांनी आरोप केला आहे. या मारहाणीत त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही जखमी झाल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.






