nagar | शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगर, (प्रतिनिधी) – शहरात वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. यावेळी शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे,
युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, संदीप दातरंगे, जेम्स आल्हाट, गौरव ढोणे, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, संजय आव्हाड, अरुण झेंडे, दिनेश लाड, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. वीजेची झालेली दरवाढ आणि वेळेवरही लाईट बील भरुनही नागरिकांना व व्यापार्यांना योग्य सेवा मिळत नाही. परिणामी इर्न्व्हटर, जनरेटचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे.
वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की वीज चार-चार तास तर कधी-कधी रात्रभर येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागते. वीज वितरण कार्यालयात फोन लावला तरी फोन उचलत नाही आणि उचललाच तर व्यवस्थीत उत्तरे देत नाही. तरी ही वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.





