पिंपरी | साथीचे रोग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूमुळे शहरातील एकाही नागरिकाला प्राणास मुकावे लागू नये, म्हणून प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, डास उत्पत्ती केंद्र शोधून उपाययोजना करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. भापकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून पिंपरी – चिंचवड शहरातही पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांत डासांचे प्रमाण वाढत असून, त्याचा उपद्रव शहरातील नागरिकांना होत आहे. शहरात विविध ठिकाणी अनेक नवीन बांधकामे, दुरुस्ती बांधकामांचे कामे सुरू आहेत.
गावठाण भागांमध्येही अनेक घरांवर, कुंड्या, नारळाच्या करवंट्या, जुन्या प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून डेंग्यूचे डास होतात. डेंग्यू, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसामुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांचा फैलाव होऊन एकाही शहरवासीयाला प्राणास मुकावे लागू नये, यासाठी मलेरियाची स्थळे नष्ट करण्यासाठी मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.





