ICMR Report on Malaria : भारतासाठी आरोग्याच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी दिलेल्या अहवालानुसार, 2030 पर्यंत भारत मलेरियामुक्त होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ICMRच्या राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, देशातील 92 टक्के जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अतिशय कमी झाला आहे. मागील काही वर्षांत मलेरियाच्या रुग्णसंख्येत तब्बल 85 टक्क्यांनी घट झाली आहे. मलेरियावर भारताने पूर्वीही मिळवले होते नियंत्रण 1960 च्या दशकात भारताने मलेरिया जवळपास संपवला होता. मात्र 1970 च्या दशकात हा आजार पुन्हा वाढला. आता मात्र पुन्हा एकदा भारत मलेरिया पूर्णपणे संपवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ICMRच्या अहवालानुसार, 2015 ते 2024 या कालावधीत मलेरियाच्या रुग्णसंख्येत 80 ते 85 टक्क्यांनी घट झाली आहे. 2024 मध्ये देशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मलेरियाचे प्रमाण एका अंकात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारत सध्या ‘प्री-एलिमिनेशन’ टप्प्यात आहे. मलेरिया म्हणजे काय? मलेरिया हा प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवींमुळे होणारा गंभीर आजार आहे. हा आजार संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्याने पसरतो. साचलेले पाणी हे डासांचे मुख्य प्रजननस्थळ असते. भारतात जुलै ते नोव्हेंबर या काळात मलेरियाचे रुग्ण जास्त आढळतात. 2030 पर्यंत मलेरियामुक्त भारताचा संकल्प केंद्र सरकारने 2030 पर्यंत भारत मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर सध्याचा वेग कायम राहिला तर हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होऊ शकते. मलेरिया संपवण्यासाठी कोणत्या उपायांवर भर? मलेरिया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सरकार ‘मिशन मोड’मध्ये काम करत आहे. त्यामध्ये, संशयित रुग्णांची घराघरांत जाऊन तपासणी व मोफत उपचार डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी ग्रामीण व गरीब भागात मोफत मच्छरदाणी (LLINs) व रिपेलेंट्स वाटप आदिवासी व दुर्गम भागांसाठी फिरती वैद्यकीय पथके साचलेले पाणी हटवून डासांच्या अळ्यांचा नायनाट ICMRच्या शास्त्रज्ञांच्या मते, आता उरलेल्या 8 टक्के जास्त धोकादायक जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या भागांत प्रभावी उपाय केल्यास भारताला जागतिक स्तरावर अधिकृत मलेरियामुक्त देश म्हणून घोषित केले जाऊ शकते.