तोरणा-राजगडावर शिवस्मारकाची मागणी; शिवप्रेमींचे प्रशासनाला साकडे!

राजगड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या तोरणा आणि राजगड किल्ल्यांवर शिवस्मारके उभारण्याची मागणी शिवप्रेमींनी प्रशासनाकडे केली आहे. या स्मारकांमुळे इतिहासाचे स्मरण होईल, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती जागेल आणि स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला. यासाठी त्यांनी तहसीलदार (वेल्हे) आणि वेल्हे पोलीस स्टेशनला निवेदन सादर केले.
युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरघे, उपाध्यक्ष सचिन ढोरे, माजी सरपंच शरद पिलाने, मनसे तालुकाप्रमुख दिगंबर चोरघे, गोपाळ इंगुळकर, एकनाथ वालगुडे, शैलेश वालगुडे, सागर मोझर, कुंदन गंगावणे, चंद्रकांत मोरे, खंडू गायकवाड, अंनता उफाळे, भगवान खुटवड, विशाल वालगुडे, दत्ता पानसरे, नाना शिर्के यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गडांचे ऐतिहासिक वैभव आणि पर्यावरण अबाधित ठेवत स्मारके उभारली जातील.
रोहिदास चोरघे म्हणाले, “आम्ही संविधानिक मार्गाने परवानगी मागत आहोत. मात्र, काही शिवभक्तांनी भावनेच्या भरात विनापरवाना पुतळा बसवल्याने प्रशासनाने गुन्हे दाखल केले. ते मागे घ्यावेत.” शिवप्रेमींनी प्रशासनाला स्मारकांसाठी त्वरित परवानगी देण्याची आणि गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. याला शासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा आहे. स्मारकांमुळे पर्यटक वाढतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असा दावा शिवप्रेमींनी केला.




