Pune District : राजगडच्या दुर्गम वस्त्यांमध्ये ७८ वर्षांनी वीज! दिवाळीच्या मुहूर्तावर उमराटकर-मोरे वस्ती झाली ‘प्रकाशित’

राजगड : राजगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बार्शीमाळ गावामधील उमरटकर वस्ती व बालवड गावातील मोरे वस्ती या भागातील घरांना वीज कनेक्शन नव्हते. त्यामुळे ऐन दिवाळीत सर्व ठिकाणी प्रकाश आणि आपल्या घरात अंधार अशीच काहीशी परिस्थिती येथील नागरिकांना सतावित होती. मात्र, महावितरणाच्या तत्परतेने या भागातील नागरिकांचा वीज कनेक्शनचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सदर वस्तीमधील नागरिकांनी घरात वीज मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केला होता. त्यावर मंजुरी करिता अंदाजपत्रक मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैकर यांच्याकडे वेल्हा शाखा कार्यालयमधुन शाखा अभियंता सचिन कुलकर्णी यांनी पाठविले. त्यावर कार्यकारी अभियंता बैकर यांनी सदर वस्तीमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही, असे समजताच सदर अंदाजपत्रक तात्काळ मंजूर करून कामास सुरूवात करण्यात आली.
अवघ्या ४८ तासांमध्ये काम पूर्ण करून सर्व घरांना वीज मीटर बसवून महावितरणने या भागातील सर्व घरे प्रकाशमय केली आहेत. यामुळे आता नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत आहे. याबद्दल नागरिकांनी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी कुलकर्णी, थोरवे मॅडम, सोनसळे, आग्रवाल ठेकेदार व मुळशी विभागचे कार्यकारी अभियंता बैक यांचे आभार मानले





