अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई – अजित पवार (Ajit Pawar) गटातील पाच आमदारांच्या विरोधात शरद पवार ( Sharad Pawar) गटाने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या पाच आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan), अमोल मिटकरी (Amol Mitkari), विक्रम काळे (Vikram Kale) आणि अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांच्याविरोधात नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याकडे तक्रार केली आहे. तर शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाडांनी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
शिवसेना आमदारांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर वेळकाढूपणा केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलेच खडेबोल सुनावले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणालाही उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून वेग दिला जात असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर अजितदादा गटाच्या आमदारांनी बाजू मांडावी म्हणून त्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात नोटीस बजावली जाणार आहे.
सरीकडे, राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर कुठला आमदार कोणत्या गटात आहेत, असा संभ्रम अजूनही कायम आहे. अजित पवार यांनी दोन वेळेस शरद पवार यांची गुप्तपणे भेट घेतली. त्यानंतर आता नवीन संसदेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात खरेच फूट आहे का? की शरद पवारांचीच ही खेळी आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणूक आयोगासमोर 6 तारखेला सुनावणी
पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अजित पवार गटाने विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे. आपणच मूळ राष्ट्रवादी आहे, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगातही सुरू आहे. 6 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही गट निवडणक आयोगासमोर काय भूमिका मांडणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे.





