अन्नपदार्थ घरपोच द्या; अन्यथा कारवाई

शहरातील हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेचा इशारा
गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी पालिका समन्वय कक्ष
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने सर्व हॉटेल्स व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठीच्या खानवळी, महाविद्यालय, वसतिगृहातील मेस यांनी फोनवरून खाद्यपदार्थांची मागणी केल्यानंतर “होम डिलेव्हरी’ पार्सल स्वरूपात करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच अन्न आणि शिधा याची गरज असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे.
करोनामुळे काही नागरिकांवर उपजीविकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृद्ध, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आदींचा समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. अन्न आणि शिधा याची गरज असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे.
या कक्षाचे प्रमुख म्हणून सहायक आयुक्त संदीप खोत काम पाहत आहेत. भोसरी येथील इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातून या कक्षाचे काम सुरू झाले आहे. या कामकाजासाठी स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी कार्यरत असणार आहेत.





