Virat Kohli Retirement : ‘तो इंग्लंडविरुद्ध ४-५ शतकं…’, विराटच्या निवृत्तीनंतर दिल्लीच्या कोचचा मोठा खुलासा

Sarandeep Singh statement on Virat Kohli Test retirement : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून जगभरातील त्याच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. १२ मे रोजी विराटने त्याच्या कसोटी कारकिर्दीला निरोप दिला. आता तो भारतासाठी फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल. पण, विराट कोहली भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास तयार होता. या मालिकेत त्याने ४ ते ५ कसोटी शतके करण्याचे आश्वासनही दिले होते, असा खुलासा दिल्ली क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी केला.
सरनदीप सिंगचा विराटबद्दल मोठा खुलासा –
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सरनदीप सिंगने एक मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की “मी काही आठवड्यांपूर्वी विराटशी बोललो होतो. मी विचारले की तो इंग्लंड मालिकेची तयारी करण्यासाठी काउंटी क्रिकेट खेळणार आहेस का? यावर विराटने सांगितले होते की तो इंग्लंडमध्ये भारत अ संघाकडून दोन सामने खेळेल. विराटने त्यावेळी कसोटीतून निवृत्त होण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. खरं तर, तो इंग्लंड मालिकेसाठी पूर्णपणे तयार दिसत होता.”
“Was preparing for England tour”: Sarandeep reveals jaw-dropping conversation with Virat before Test retirement call
Read @ANI Story | https://t.co/tBlXCvWojv#SarandeepSingh #ViratKohli #ViratKohliTestRetirement #TeamIndia #cricket pic.twitter.com/XKP6o2z913
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2025
विराट इंग्लंडविरुद्ध ४-५ शतके झळकावणारा होता –
सरनदीप सिंग पुढे म्हणाले, “विराटने मला सांगितले होते की, त्याला २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ४-५ शतके करायची आहेत. रणजी ट्रॉफी दरम्यानही तो फक्त इंग्लंड मालिकेबद्दल बोलत होता. पण हा प्रश्न अजूनही आपल्याला सतावत आहे की विराटने अचानक निवृत्तीची घोषणा का केली? तो इंग्लंड दौऱ्यासाठी पूर्ण तयारी करत असताना.”विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामने खेळले आणि ९२३० धावा केल्या. या काळात त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली.
विराट निवृत्तीच्या पोस्टमध्ये काय लिहिले?
इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा करताना विराटने त्याचा कसोटी प्रवास खूप खास आणि त्याच्या हृदयाच्या जवळचा असल्याचे सांगितले. विराटने लिहिले की, कसोटी क्रिकेटने त्याला खूप काही शिकवले आहे, स्वतःला आव्हान देणे, स्वतःमध्ये सुधारणा करणे आणि जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे दिले आहेत. त्याने कबूल केले की हा निर्णय घेणे सोपे नव्हते, परंतु आता योग्य वेळ आहे. कोहलीने असेही म्हटले की त्याने खेळासाठी आपले सर्वस्व दिले आणि त्या बदल्यात त्याला अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. त्याच्या पोस्टच्या शेवटी, विराटने खेळाचे, संघातील सहकाऱ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आणि लिहिले “२६९, साइनिंग ऑफ”.





