Delhi Red Fort Blast | Narendra Modi : देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सोमवारी एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १०हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर २० हून जास्त जण जखमी आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातील विविध सुरक्षा तपास यंत्रणेकडून छापेमारीची मोहीम राबवण्यात येत आहे. तपास यंत्रणांनी या स्फोटानंतर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी चालू आहे. दरम्यान, आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमी नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. स्फोटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान दौऱ्यावर होते. देशाबाहेर असूनही त्यांनी तातडीने घटनेची दखल घेतली आणि आपल्या भाषणात दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मात्र, दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तातडीने दिल्लीतील LNJP (लोकनायक जयप्रकाश नारायण) हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी जखमी नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. हॉस्पिटल भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी “Went to LNJP Hospital and met those injured… Praying for everyone’s quick recovery,” अशा शब्दांत जखमींना भावनिक आधार दिला. या हल्ल्यामागे असलेल्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधानांनी दिला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “Those behind the conspiracy will be brought to justice!” पंतप्रधानांनी तपास यंत्रणांना या स्फोटाच्या कटाच्या मुळापर्यंत जाऊन सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे.