Video: लाल किल्ल्याजवळील कार स्फोटाबाबत महत्वाची माहिती समोर; नेमकं काय घडलं जाणून घ्या.. 1 मृत्यू 8 जखमी

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, ८ लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाची तीव्रता अधिक, एनआयए पथक घटनास्थळी –
हा स्फोट इतका जोरदार (हाय इंटेंसिटी) होता की, परिसरात मोठी भीती पसरली आहे. स्फोटानंतर कारने पेट घेतला आणि आगीच्या भक्ष्यस्थानी ७ ते ८ अन्य वाहनेही आली, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटाची सूचना अग्निशमन दलाला संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ झाला, जो अतिशय वर्दळीचा परिसर आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांच्या काचाही फुटल्या.
#WATCH | A call was received regarding an explosion in a car near Gate No. 1 of the Red Fort Metro Station, after which three to four vehicles also caught fire and sustained damage. A total of 7 fire tenders have reached the spot. A team from the Delhi Police Special Cell has… pic.twitter.com/F7jbepnb4F
— ANI (@ANI) November 10, 2025
स्फोटाची गंभीरता लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे आणि एनआयएचे (NIA) पथकही घटनास्थळी पाठवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये तातडीने ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. स्फोट सीएनजीमुळे झाला की अन्य कारणांमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोठ्या कटाची शक्यता?
सध्याच्या परिस्थितीवरून हा केवळ एक किरकोळ अपघात नसून, त्यामागे मोठा कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबाद येथे २९०० किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. अमोनियम नायट्रेटचा उपयोग सामान्यतः स्फोटके बनवण्यासाठी केला जातो. दोन्ही घटनांना तातडीने जोडणे घाईचे असले तरी, सुरक्षा यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अपडेट: पुढील माहिती मिळताच अधिक तपशील दिला जाईल.





