Delhi Red Fort Blast – दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार बॉम्बस्फोटाच्या तपासात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले असून या हल्ल्यातील दहशतवादी नेटवर्कशी जोडलेली आणखी एक संशयित कार फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमधून जप्त करण्यात आली आहे. स्फोटाच्या दिवशी मुख्य आरोपी डॉ. उमर नबी याच्या हालचाली दर्शवणारे नवे सीसीटीव्ही फुटेजही तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये सिल्वर रंगाची मारुती ब्रेझा उभी असल्याचे आढळून आले आहे. दहशतवाद विरोधी पथक, राष्ट्रीय तपास यंत्रणा, बॉम्ब निकामी पथक आणि फॉरेन्सिक पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत आणि वाहनाची कसून चौकशी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ब्रेझा कार सोमवारी स्फोटात वापरल्या गेलेल्या आय २० कारचा मुख्य आरोपी डॉ. उमर नबी याच्या नेटवर्कशी जोडलेली आहे. ही कार डॉ. शाहीन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. यापूर्वी, डॉ. शाहीन यांची दुसरी कार (मारुती स्विफ्ट) जप्त करण्यात आली होती, ज्यात पोलिसांना असॉल्ट रायफल सापडली होती. तपास यंत्रणांना शंका आहे की, ब्रेझाचा वापर स्फोटापूर्वी लॉजिस्टिक्स सपोर्ट किंवा स्फोटक पदार्थ हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आला असावा. फरीदाबाद पोलिसांनी विद्यापीठ परिसर तात्पुरता सील केला असून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे.