दिल्ली वार्ता : राजीनाम्याची चर्चा का?

– वंदना बर्वे
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू होतोय तरी एक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेे. तो म्हणजे, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज सोमवारपासून सुरू होतो आहे. पहिल्या आठवड्यात केवळ ‘गोंधळ’ बघायला मिळाला होता. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावर संसदेत चर्चा घेण्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झालं आहे. सध्या संसदेच्या पटलावर अनेक मुद्दे आहेत. अनेक विधेयकं पारित होणे आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्धचा महाभियोग प्रस्ताव लोकसभेत आणला जाणार आहे. बिहार मतदारयादीचा आढावा हाही ज्वलंत मुद्दा आहे. या सर्व मुद्द्यांवर सरकार आणि विरोधक आमनेसामने आहेत. परंतु, केंद्रीय मंत्र्यांपासून ते ग्राम पंचायतीच्या सदस्यापर्यंत सर्वांना पडलेला एकमेव यक्षप्रश्न म्हणजे, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला? धनखड यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिल्याने राजकारणात मोठा भूकंप आला.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नेते आणि राजकीय विश्लेषकांना कारण शोधण्याच्या कामी लावले आहे. धनखड यांनी तब्येतीचे कारण दिले आहे. मात्र, यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. धनखड यांची तब्येत ठणठणीत वाटत होती, असं राज्यसभेतील सर्वपक्षीय नेते आणि खासदारांचं म्हणणं आहे. खरं सांगायचं झालं तर, या प्रश्नाचं उत्तर हायकमांडला सोडलं तर कुणाकडेही नाही. प्रत्येक जण आपापल्या कल्पनाशक्तीनुसार अंदाज लावतो आहे. मात्र, काही खासदारांच्या म्हणण्यात दम वाटतो. त्यांच्या मते, प्रकृती बरी नसल्यामुळे धनखड यांनी राजीनामा दिला हे खरं असेलही; पण अधिवेशन संपेपर्यंत तरी पदावर रहा, असा आग्रहसुद्धा कुणी त्यांच्याकडे धरला नाही.
पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत ते उपराष्ट्रपती पदावर राहू शकणार नाही एवढी काही तब्येत बिघडली नव्हती, हे मान्यच करावं लागेल. सत्ताधारी पक्षाचा एकही नेता समजूत काढण्यासाठी त्यांच्याकडे गेला हेही घडलेलं नाही. शेवटी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला. आता तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रियासुद्धा सुरू झाली आहे. काही नेत्यांच्या मते, ही आकस्मिक घडलेली घटना नसून याची तयारी आधीपासून सुरू होती. यात किंचितही दुमत नाही की, धनखड यांच्या काही विधानांमुळे सरकार अनेकदा बॅकफूटवर आले. यामुळे हायकमांड त्यांच्यावर नाराजही होते.
कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या कार्यक्रमातच धनखड यांनी सरकार शेतकर्यांच्या समस्या दूर करण्यासाठी काहीच का करीत नाही, असे विधान केले होते. न्यायपालिकेवरही निशाणा साधला होता. धनखड यांच्या अशा विधानांमुळे सरकारला अनेकदा बॅकफूटवर यावे लागले होते. यामुळे भाजपात त्यांच्याप्रती नाराजी वाढली होती. या नाराजीत भर पडली ती दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्धचा विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्यामुळे. सरकार आणि विरोधी पक्षात महाभियोग प्रस्तावाच्या मुद्द्यावर एकमत झाले होते. पंरतु, धनखड यांनी स्वीकारलेल्या प्रस्तावावर फक्त विरोधकांच्याच सह्या होत्या. शिवाय प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती सत्तापक्षाला नव्हती. या घटनेने आगीत तेल ओतण्याचे काम केले असे म्हणायला हरकत नाही.
धनखड यांनी बोलाविलेल्या बिजनेस अॅडव्हायजरी कमेटीच्या बैठकीला सत्तापक्ष नेते उपस्थित राहिले नाही. सध्या तीन संसदीय कामकाज मंत्री आहेत. उपनेतासुद्धा असतो. एक मंत्री, दोन राज्यमंत्री, सत्तापक्ष नेते आणि एक उपनेते असे पाच जण असतानाही एकही बीएसीच्या बैठकीला नव्हते. यावरून नाराजीचे स्वरूप लक्षात घेतले जाऊ शकते. दुसरीकडे, जगदीप धनखड काही दिवसांपासून नाराज दिसत होते, असे काही लोकांचे मत आहे. विशेषतः वरिष्ठ अधिकारी आपले ऐकत नाही अशी त्यांची तक्रार होती. अलीकडेच त्यांनी भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील माजी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. या ठिकाणी त्यांनी आपले मन हलके केले होते, अशी चर्चा आहे.
खरं म्हणजे, पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी कामकाज सांभाळले होते; त्यामुळेच धनखड यांना पक्षाने उपराष्ट्रपती पदी बसविले होते. राज्यसभेतील त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे विरोधी पक्ष नेते नाराज होते. ही बाब विरोधकांनी अनेकदा बोलूनही दाखविली. तरीसुद्धा, सर्वपक्षांतील नेत्यांसोबतचे संबध चांगले असावे असे त्यांना वाटत होते. अलीकडच्या काळात धनखड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांच्या भेटी-गाठी घ्यायला सुरुवात केली होती.
यामुळे भाजपात नाराजीचा ग्राफ वाढत होता. अलीकडेच, धनखड आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती आणि दोन्ही नेत्यांनी जवळपास अडीच तास बंद खोलीत चर्चा केली होती अशी चर्चा आहे. विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांसोबत चांगले संबंध रहावे अशी आपली इच्छा असल्याचे धनखड या बैठकीत म्हणाले होते, असं म्हणतात. कदाचित यात सत्य असावं. म्हणूनच राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांची टीम धनखड यांच्या भेटीला गेली होती. या भेटीचा जयराम रमेश यांच्या मनावर चांगला परिणाम झाला. राज्यसभेत आता सगळं काही ठीक झालं आहे असं त्यांना वाटलं आणि हीच बाब त्यांनी ज्येष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कानावर घातली.
धनखड यांनी काँग्रेसप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबतही संवाद साधायला सुरुवात केली. यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही भेटले. डाव्या विचाराचे आणि तटस्थ पत्रकारांनाही ते भेटले. धनखड यांनी न्यायव्यवस्थेच्या वर्चस्वालाही आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब सरकारलाही आवडली नव्हती. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारल्यापासून सरकारला न्यायव्यवस्थेशी कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. यामुळे धनखड हायकमांडला असह्य झाले होते. यात किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही. परंतु, न्यायमूर्ती वर्मा यांच्याव्यतिरिक्त धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू होती असं म्हणतात. या प्रस्तावाबाबत धनखड यांना सूचितही करण्यात आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा एवढी विकोपाला गेली की धनखड नाराज झाले.
दुसरीकडे, भाजपने राजीनामा देण्यास सांगितलं नव्हतं असं काही जणांचं म्हणणं आहे. मग, राजीनामा घ्यायचा नव्हता तर अविश्वास प्रस्ताव कशासाठी आणला जाणार होता? हा प्रश्न निर्माण होतो. काहीही असो धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला गेला आहे. एक मात्र नक्की की, धनखड यांना राज्यसभेत औपचारिक निरोपसुद्धा देण्यात आलेला नाही. राज्यसभेचा खासदार निवृत्त होत असेल तर त्यांनाही औपचारिक निरोप दिला जातो. सर्वपक्षांचे नेते आपापली भावना आणि त्यांच्यासोबत असलेल्या संबंधाचे कौतुक करतात. पंरतु, उपराष्ट्रपती यांच्याबाबत असं घडताना दिसलं नाही.
अशात, 25-26 विरोधी पक्षांनी धनखड यांच्या निरोपासंदर्भात ‘डिनर’चे आयोजन करण्याचे ठरविले होते. राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून त्यांना ही माहिती दिली. ‘आम्ही दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये तुमच्या सन्मानार्थ निरोप कार्यक्रम आयोजित करीत आहोत. यावेळी सभागृहातील तुमच्या योगदानाबद्दल चर्चा करू’, असे राहुल गांधी यांनी सांगितले. यावर धनखड भावनिक झाले नसतील तरच नवल! डिनरसाठी धनखड यांनी विरोधी पक्षांचे आभार मानले. मात्र, डिनरचे निमंत्रण स्वीकारले तर राजीनाम्याला राजकीय रंग प्राप्त होईल आणि तसे व्हावे असं मला वाटत नाही असे, ते म्हणाले. अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्यात हा मुद्दा कोणता रंग धारण करतो हे बघायला मिळेल.





