दिल्ली वार्ता : बिहारमधील राजकीय हालचाली

– वंदना बर्वे
राष्ट्रीय जनता दलाची धुरा पुन्हा आपल्या हाती घेतल्यानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव पुन्हा सक्रिय झालेले असून त्यांच्या नेतृत्वातच आता आगामी विधानसभा निवडणूक लढविली जाईल.
बिहारमधील विधानसभेची आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापत चालले आहे. राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपचा समाचार घेण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही, तर भाजप आणीबाणीचा मुद्दा उकरून काढत काँग्रेसला आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
बिहार विधानसभेची निवडणूक आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीने देशातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. या निवडणुका बिहार आणि महाराष्ट्रात होणार असल्या तरी याची व्याप्ती संपूर्ण देशभरात पसरली असल्याची जाणीव होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आक्रमकता लाख प्रयत्न करूनही कमी होताना दिसत नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि आयोग यांनी मॅच फिक्स केली होती, असा आरोप वारंवार करून राहुल गांधी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न करीत आहे. याची पुनरावृत्ती बिहारच्या निवडणुकीतही होईल, असे भाकितही ते करीत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत अधिसूचना काढण्याचे आणि तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाला दिले होते. काही कारणास्तव निवडणुकीचा वेळ वाढवून हवा असेल तर आयोगाने तसा अर्ज करावा आणि न्यायालय त्याचा विचार करेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, याचे पुढे काय झाले याबाबत अनभिज्ञता आहे.
दुसरीकडे, बिहारची निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले बिहार देशातील तिसरे राज्य होय. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. अशात, या राज्याला हलक्यात घेणे भाजपला 2029 मधील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परवडणारे नाही.
बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात रालोआचं सरकार आहे. भाजप बिहारमध्ये स्वबळावर लढण्याच्या स्थितीत नाही. अशात, नितीशकुमार यांच्या जेडीयूसोबत लढावे लागेल. मात्र, लोकजन शक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी राज्यातील सर्व 243 जागांवर उमेदवार उतरविण्याची घोषणा केली आहे.
यामुळे, भाजप आणि जेडीयू नक्कीच अस्वस्थ झाली आहे. सध्या दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावर कानावर होत आणि तोंडावर बोट ठेवले असले तरी जेडीयूच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असेल. कारण, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती आणि याचा सर्वाधिक फटका जेडीयूला बसला होता. याच कारणामुळे जेडीयूच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा कमी होती.
अशात, लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आल्यामुळे बिहारची निवडणूक अधिक रोमांचक होण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रीय जनता दलाची धुरा आपल्या हाती घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
ही निवडणूक राजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी होणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीवरून त्यांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते बिनविरोध पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील हे निश्चित आहे. लालू प्रसाद जवळजवळ तीन दशकांपासून या पक्षाचे नेतृत्व करत आहेत.
लालूप्रसाद यादव 78 वर्षांचे झाले आहे. अशात, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत, असा विरोधी पक्षातील नेत्यांचा समज झाला होता. मात्र, लालूप्रसाद यांनी त्या सर्वांच्या स्वप्नांवर विरजण सोडले. ते पत्नी राबडीदेवी यांच्यासह पक्ष कार्यालयात पोहोचले आणि तेथेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. यावेळी धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांच्यासह राजदचे वरिष्ठ नेते होते. यावेळी आरजेडी कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमली. सर्वजण लालूप्रसाद यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते.
यावेळी तेजस्वी यादव यांनी लालूप्रसाद यादव यांचे नेतृत्व आपल्याला आगामी निवडणुकीत यश मिळवून देईल, असा आशावाद व्यक्त केला. आरजेडीची राज्य परिषदेची बैठक गेल्या आठवड्यातच झाली होती. यामध्ये लालूप्रसाद यांनी राजद कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांना बिहारचे पुढचे मुख्यमंत्री बनवण्याच्या संकल्पाने पुढे जाण्याचे आवाहन केले होते.
राजकीय रणनीतीकार प्रशांत कुमार यांनीही बिहार निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. काँग्रेस पक्ष राजदसोबत हातमिळवणी करून मैदानात उतरणार आहे. मात्र, यात जागावाटपाचा मुद्दा आघाडी होण्यात आडकाठी ठरू शकतो.
चिराग पासवान आणि प्रशांत कुमार यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढली तर त्याचा फायदा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नक्कीच भाजपला होणार. कारण, या दोन्ही पक्षांचे उमेदवार राजद, काँग्रेस आणि भाजपविरोधी पक्षांच्या मतांमध्ये विभाजन करणारे असतील. आणखी महत्त्वाचा मुद्दा असा की, चिराग पासवान यावेळी मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.





