दिल्ली वार्ता: मतदारसंघ पुर्नरचनेचा फायदा?

– वंदना बर्वे
जम्मू-काश्मीरचे मैदान विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालं आहे. कलम 370 हटविल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना केली गेली. भाजपला याचा फायदा होतो की फटका बसतो? याकडे लक्ष आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक होय. कलम 370 हटविल्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तत्कालिन मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र आणि उपायुक्त चंद्रभूषण कुमार या आयोगाचे सदस्य होते. रंजना देसाई आयोगाने मार्च 2021मध्ये अहवाल सादर करायचा होता. परंतु कोविड-19 मुळे आयोगाला आपले काम पूर्ण करता आले नाही आणि त्याचा कार्यकाळ 6 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आला होता.
देसाई आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने विधानसभा आणि लोकसभेच्या जागांबाबत अधिसूचना जारी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आणि लोकसभेच्या 5 जागा राहतील, असे सुशील चंद्र यांनी जाहीर केले होते. जम्मूमध्ये विधानसभेच्या 43 आणि काश्मीर खोर्यात 47 जागा आहेत. यातील 7 जागा अनुसूचित जातीसाठी, तर 9 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनाग-राजौरी, उधमपूर आणि जम्मू या पाच लोकसभा जागा असतील, असे त्यांनी सांगितले होते.
अनुसूचित जातीसाठी ज्या जागा राखीव आहेत त्यात जम्मूतील बिश्नाह, सुचेतगड, मार आणि अखनूर आहेत. याशिवाय सांबा, कठुआ आणि रामनगरही राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी ज्या जागा राखीव आहेत त्यात गुलाबगढ, कोकेरनाग, राजोरी, थन्नामंडी, बुधल, सुरनकोट मेंढार, कंगन आणि गुरेझ या 9 जागांचा समावेश आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या रोस्टरमध्ये बदल झाल्यामुळे अनेक जागांचे समीकरण बिघडले आहे. यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढणार्या नेत्यांना आता नवीन मतदारसंघ शोधावा लागत आहे.
याशिवाय, जम्मू-काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे.ज्या जागा एसटीसाठी राखीव झाल्या आहेत त्या सर्व जागा पूर्वी सामान्य संवर्गातील होत्या. यामुळे या सर्व जागांवर निवडून आलेल्या आमदारांसमोर नवीन क्षेत्र शोधण्याचे आव्हान होते. राजोरी आणि पूंछ जिल्ह्यातील आठपैकी पाच जागा एसटीसाठी राखीव झाल्यानंतर उर्वरित तीन जागांसाठी दावेदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर अनेक दिग्गजांना स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधावी लागत आहे. काही मतदारसंघ पूर्णपणे अदृश्य झाले आहेत, तर काही नवीन मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. यामुळे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांना अडचण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा बीरवाह मतदारसंघ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. म्हणूनच की काय त्यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली आहे. तरी पक्षाकडून लढण्यासाठी दबाव टाकला जात आहे. दोन माजी उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंग आणि कवींद्र गुप्ता यांनीही नव्या जागांचा शोध सुरू केला आहे. निर्मल सिंह कठुआच्या बिलवार जागेऐवजी बसोली मतदारसंघातून तयारी करत असल्याची चर्चा आहे. कविंद्र यांनी गांधीनगरमधून मागील निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ आता अन्य मतदारसंघात विलीन झाला आहे. यामुळे त्यांनी आरएस पुरा-जम्मू दक्षिणमधून उतरण्याची तयारी केली आहे. यात गांधीनगरचा काही भाग आहे.
आयोगाने विस्थापित काश्मिरी हिंदूच्या दोन प्रतिनिधींना आणि पाकव्याप्त काश्मीरमधील विस्थापित लोकांना प्रतिनिधित्व देण्याची शिफारस केली होती. पुनर्रचनेनंतर सात नवीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. याचा परिणाम व्होटबँकेवर होणार आहे. काश्मीरमधील विधानसभा मतदारसंघांची संख्या 83 वरून 90 झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील 24 जागा पुनर्रचनेच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू विभागात जाट समाजाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला आहे. तर मुस्लीम प्रभाव असलेल्या विधानसभा मतदारसंघांची संख्याही कमी झाली आहे. शीख, शिया, गुज्जर-बकरवाल आणि पहाडी भाषिक मतदारही काश्मीरमध्ये मजबूत झाले आहेत. निर्णायक स्थितीत असूनही कोणाच्याही जय-पराजयाकडे लक्ष न देणारा हाच समाज वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात विभागला गेला.
मतदारसंघाची पुनर्रचना होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 111 जागा होत्या. यातील जम्मू विभागात 37, काश्मीर विभागात 46 आणि लडाखमध्ये 4 जागा होत्या. याशिवाय गुलाम काश्मीरसाठी 24 जागा राखीव आहेत. लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये 107 जागा राहिल्यात. यात जम्मूत 36 आणि काश्मीरमध्ये 46. पाकव्याप्त काश्मीरमधील 24 जागा जशाच्या तशाच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची शेवटची निवडणूक 2014 मध्ये झाली होती. 87 जागांसाठी सुमारे 65 टक्के मतदान झाले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 23 टक्के मते मिळाली होती. परंतु पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या होत्या. डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सने 15 तर काँग्रेसने 12 जागा जिंकल्या होत्या. सीपीआयएम आणि पीडीएफला प्रत्येकी एक जागा आणि तीन जण अपक्ष निवडून आले होते.
भारतीय जनता पक्षाने त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीशी युती करून काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. मात्र, 2018 मध्ये ही युती तुटली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तेव्हापासून निवडणूक झालेली नाही. काश्मीरच्या निवडणुकीत अन्य पक्षांपेक्षा भाजपची प्रतिष्ठा जास्त पणाला लागली आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातच राष्ट्रपती राजवट लागली, कलम 370 हटले आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाली. काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी झाली आहे. भाजप स्वबळावर लढणार आहे. याशिवाय मेहबुबा मुफ्ती यांची पीडीपी, अल्ताफ बुखारी यांची अपनी पार्टी, गुलाम नबी आझाद यांची डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी, सज्जाद लोन यांची जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्स आणि लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या इंजिनिअर रशीद यांच्या अवामी इत्तेहाद पक्षाचा समावेश आहे.
रशीद यांच्या पक्षाचा उत्तर काश्मीरमध्ये पाठिंबा वाढला आहे. काश्मीरमधील मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या मुद्द्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. देशभरातील मतदारसंघाची पुनर्रचना 2026 पर्यंत थांबविली असताना केंद्र सरकार फक्त काश्मीरमध्ये पुनर्रचना करण्याचे काम करीत आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये शेवटची पुनर्रचना 1995 मध्ये करण्यात आली होती. पुनर्रचनेनंतर जम्मूमधील 44 टक्के मतदार 48 जागांवर मतदान करतील, तर काश्मीर खोर्यातील 56 टक्के नागरिक उर्वरित 52 जागांवर मतदान करतील. तत्पूर्वी, काश्मीरमधील 56 टक्के जनता 55 जागांवर मतदान करीत होती आणि जम्मूचे 43.8 टक्के जनता उर्वरित जागांवर मतदान करीत होती. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरची जनता कोणत्या पक्षाच्या हाती राज्याची धुरा देते? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.





