Delhi Election 2025 : देशाच्या राजधानीतील हाय-व्होल्टेज प्रचाराच्या तोफा थंडावल्या !

Delhi Election 2025 – देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी सायंकाळी समाप्त झाला. हाय-व्होल्टेज प्रचाराच्या तोफा शांत झाल्याने आता दिल्लीकर त्यांचा कौल देण्यासाठी सज्ज होतील. दिल्ली निवडणुकीसाठी बुधवारी (५ फेब्रुवारी) मतदान होईल.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. त्या संख्याबळाचा विचार करता दिल्ली विधानसभा इतर अनेक राज्यांमधील विधानसभांच्या तुलनेत छोटी आहे. मात्र, थेट देशाच्या राजधानीतील विधानसभा असल्याने संबंधित निवडणुकीला संपूर्ण देशाच्या दृष्टीने मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
त्यातून सर्वच राजकीय पक्षांनी दिल्लीत बाजी मारण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आताच्या निवडणुकीला आप, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातील तिरंगी लढतीचे स्वरूप आले आहे. त्या पक्षांनी अतिशय आक्रमक पद्धतीने प्रचार मोहिमा राबवल्या. त्यातून प्रचारकाळात दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले.
प्रचारावेळी टीकेच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. त्यातून तीव्र स्वरूपाचे शाब्दिक युद्ध रंगले. दिल्लीतील सत्तारूढ आपने प्रमुख प्रतिस्पर्धी मानत भाजपचा उल्लेख भारतीय झुठा पक्ष म्हणून केला. तर, भाजपने आपचा सातत्याने आपत्ती म्हणून उल्लेख केला. कॉंग्रेसनेही त्या दोन्ही पक्षांवर टीकेची झोड उठवत प्रचाराचा धुरळा उडवून दिला.
आपने दिल्लीची सत्ता राखण्याचा निर्धार केला आहे. तर, दोन तपांपेक्षा अधिक काळानंतर देशाच्या राजधानीतील सत्तेत कमबॅक करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील २ विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. यावेळी तो पक्ष राजकीय आश्चर्य घडवणार का याविषयी उत्सुकता आहे. नेमके काय घडणार या प्रश्नाचे उत्तर ८ फेब्रुवारीच्या निकालातून मिळेल.





