Delhi Election 2025 : दिल्लीत पुन्हा एकदा पोस्टर वॉर ! ‘आप’ची सर्वच विरोधकांवर जोरदार टीका

Delhi Election 2025 – दिल्ली विधानसभा निवडणुक जाहीर झालेली असताना आता सत्ताधारी आम आदमी पक्षाने सर्वच विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. नव्याने एक पोस्टर वॉर आता दिल्लीत पहायला मिळत असून त्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि एआयएमआयएमवर हल्लाबोल केला आहे. आपने अमित शाह, रमेश बिधुरी, प्रवेश वर्मा, असदुद्दीन ओवैसी, संदीप दीक्षित, अजय माकन यांना एकत्र दाखवले आहे. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांना प्रामाणिक म्हटले गेले आहे.
त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहर्यावरून राजकीय पक्षांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी दावा केला की, सातत्याने अपशब्द वापरणारे उमेदवार रमेश बिधुरी यांना भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवणार आहे.
भाजपच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीत रमेश बिधुरी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिधुरी त्यांच्याच पक्षाच्या पूर्वेकडील नेत्यांशी गैरवर्तन करतात. शिवाय त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यांनी मी आणि माझ्या कुटुंबाबद्दल अपशब्दही वापरले आहेत.
लोकांकडे दोन पर्याय आहेत
आतिशी म्हणाल्या की, आता लोकांसमोर दोन पर्याय आहेत. एका बाजूला अरविंद केजरीवाल आहेत; ज्यांनी आयआयटी खरगपूरमधून शिक्षण घेतले आहे. ते आयआरएस अधिकारी राहिले आहेत. त्यांनी दिल्लीत 24 तास वीज, घरोघरी पाणीपुरवठा, सुधारित सरकारी शाळा, मोफत उपचार, वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास अशा अनेक सुविधा दिल्या आहेत. दुसरीकडे, रमेश बिधुरी आहेत, जे महिलांबद्दल अपशब्द वापरतात आणि अश्लील टिप्पण्या करतात.
केजरीवाल सुसंवाद बिघडवत आहेत :
भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आणि म्हटले की, सत्ता गमावण्याच्या भीतीमुळे त्यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे. सत्ता वाचवण्यासाठी केजरीवाल दिल्लीतील जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही. याशिवाय 21 आणि 22 सप्टेंबर रोजी महिलाविरोधी विधाने करण्यात आली. त्यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि 1 जानेवारी रोजी खोट्या बातम्या पसरवून दिल्लीत जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.





