Delhi Election 2025 : दिल्लीकरांसाठी ‘केजरीवाल की गॅरंटी’; जाहीरनाम्यातून दिली ‘हे’ १५ आश्वासने

Delhi Election 2025 – देशाची राजधानी दिल्लीतील सत्तारूढ आपने सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. केजरीवाल की गॅरंटी असे नाव देण्यात आलेल्या जाहीरनाम्यातून दिल्लीकरांना १५ आश्वासने देण्यात आली आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
दिल्लीतील महिलांना दरमहा २ हजार १०० रूपयांचे अर्थसहाय्य, पूर्णवेळ स्वच्छ पाण्याचा पुरवठा, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचारांची सुविधा, विद्यार्थ्यांसाठी मेट्रो प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत अशी गॅरंटीरूपी आश्वासने संबंधित जाहीरनाम्यातून देण्यात आली आहेत.
इतर आश्वासनांमध्ये रोजगार निर्मिती, यमुना नदीची स्वच्छता, पुजारी-ग्रंथींना दरमहा १८ हजार रूपये मानधन, चांगले रस्ते, ऑटो-टॅक्सीचालकांना कन्या विवाहासाठी १ लाख रूपयांची मदत आदींचा समावेश आहे.
आप सरकारकडून दिल्लीकरांना आधीपासून ६ मोफत सुविधा पुरवल्या जात आहेत. शिक्षण, उपचार, महिलांसाठी प्रवास या त्या सुविधा आहेत. त्याशिवाय, मोफत वीज आणि पाणीपुरवठाही केला जातो. दिल्लीची सत्ता राखल्यास त्या मोफत सुविधा कायम ठेवण्याची ग्वाही आपने दिली आहे.





